विजय उंडे । वीरभूमी - 09-Jun, 2022, 10:13 AM
श्रीगोंदा : विधवा प्रथेतील अनिष्ट रूढी, परंपरा व बंधने मोडीत काढण्यासाठी व विधवा महिलांचा सन्मान, संरक्षण करण्यासाठी मंगळवार दि. 7 रोजी स्मार्ट ग्राम मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथील ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेत विधवा प्रथेतील अनिष्ट चालीरीतींच्या विरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावामुळे पुरोगामी महाराष्ट्राच्या उच्च विचारसरणीला अधिक बळकटी मिळुन मढेवडगाव ग्रामपंचायत असा ठराव करणारी तालुक्यात पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
सरपंच महानंदा मांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत विधवा प्रथा निर्मूलनाची सूचना ज्येष्ठ नागरीक माणिक तुकाराम मांडे यांनी तर ज्ञानदेव रामभाऊ बनकर यांनी अनुमोदन दिले. विधवा महिलांच्या आत्मसन्मानासाठी केलेल्या सूचनेमुळे सर्व ग्रामस्थांनी एकमताने ठराव संमत केला. आज समाजात विधवा महिलांना अपमानास्पद, दुय्यम वागणूक दिली जाते.
तसेच तिच्याकडे वाईट नजरेने पाहिले जाते. एव्हढेच नव्हे तर वडिलांना अग्नी देता येत नाही. त्यामुळे विधवांचा आत्मसन्मान दुखावला जातो. विधवा प्रथा व अनिष्ट रूढी बंद करण्यासाठी मढेवडगाव ग्रामपंचायतने घेतलेल्या स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यातून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी सरपंच महानंदा मांडे, पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे, नागवडे कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे, प्रा. फुलसिंग मांडे, उपसरपंच दिपक गाडे, बाळासाहेब मांडे, विठ्ठल वाबळे, ग्रामसचिव नवनाथ गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
पतीच्या निधनानंतर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे या प्रथा बंद होण्यासाठी महिलांनी व पुरुषांनी पुढे येऊन हा ठराव मंजूर केला. यामुळे भविष्यात विधवा महिलांचा आत्मसन्मान वाढून त्यांना प्रत्येक धार्मिक, सामजिक कामात सहभागी करुन सन्मानाची वागणूक मिळणार आहे.
- महानंदा फुलसिंग मांडे, सरपंच मढेवडगाव
विधवा महिलेचा सन्मान
विधवा महिलांना सन्मान देण्याचा ठराव झाल्यानंतर एक पाऊल पुढे टाकत मढेवडगाव येथे गजराबाई सिताराम खेतमाळीस यांच्या हस्ते एका दुकानाचे उद्घाटन करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
QpHqVZIeOg