बंडोबा कसे होतील थंड?
बंडखोर्या गुरुजींच्या पुढार्यांची ठरणार डोकेदुखी!
अहमदनगर । वीरभूमी - 09-Jun, 2022, 10:20 AM
1200 कोटी ठेवींच्या जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातात असाव्यात यासाठी गुरुजींच्या सर्वच शिक्षक संघटना व त्यांची मंडळ जोमाने कामाला लागली आहेत. तालुका व जिल्हानिहाय बैठका, मेळावे घेऊन शक्तिप्रदर्शनाचे बार जोरात उडवले जाऊ लागले आहेत. मात्र, या सार्या गदारोळात बंडखोरीला मोठे उधाण येणार असल्याने बंडोबाना थंड कसे करायचे ही डोकेदुखी सर्वच पॅनल प्रमुखांना सतावत आहे!जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास पुढील आठवड्यात 17 जून पासून प्रारंभ होईल. स्वबळाचे अनेकांनी नारे दिले असले तरी युत्या-आघाड्या अपरिहार्य असल्याने आज कागदावर 11 मंडळाची निवडणूक लढविण्याची तयारी दिसत असली तरी तीन अथवा चारच प्रमुख पॅनल निवडणूक रिंगणात दिसतील!
अनेक जण एकमेकांशी आघाड्या-युत्या करून घरोबा करतील. यात छोटी मंडळ एक-दोन जागांवर अथवा विकास मंडळातील काही जागांवर समाधान मानून घेतील पण याबरोबरच मोठी तीन-चार मंडळ कोणाला सोबत घेतील किंवा कोणा सोबत जातील यावर विजयाची बरीच गणित अवलंबून असणार आहे.
हे सारे आराखडे आखताना सर्वच मंडळांना बंडखोरीला मोठया प्रमाणात सामोरे जावे लागणार हे उघड आहे. कारण गुरुजींचा पुढारी हा प्रचलित राजकर्त्यापेक्षा प्रचंड महत्वकांक्षी व उतावळा आहे. थांबायची कुणाचीच तयारी नसते त्यामुळे यातून बंडखोरीच पीक जोमाने येऊ शकते. या बंडखोरांना थंड करण्याची कसरत सर्वच पॅनल प्रमुखांची डोकेदुखी बनू शकते. ज्या मंडळात कमी बंडखोरी होईल व बंडोबाना थंड करण्यात यश येईल त्यांना सत्तेची वाट अधिक सुकर ठरेल!
शिक्षक बँकेच्या निवडणुकांचा इतिहास बघता सदिच्छा व ऐक्य(पूर्वीचे नेमस्त) ही दोनच मंडळ निवडणुकीच्या रिंगणात असत. सदिच्छामध्ये विजयाची हमखास खात्री असल्याने त्यांच्याकडे इच्छुकांची भाऊगर्दी व्हायची पण जुन्या-जाणत्या नेत्यांचा धाक व बंडोखोरांना हाताळण्याची सचोटी त्यांच्याकडे असल्याने भली भली बंडाचे निखारे प्याल्यातील वादळ होऊन शांत व्हायची, पण आता गेल्या तीन ते चार पंचवार्षिक निवडणुका पासून चित्र पूर्ण बदलले आहे.
सन 2005-06 च्या निवडणुकीत बंडाचा पहिला मोठा भडका उडाला, त्यात जे सत्ताधारी सदिच्छा मंडळ होरपळून निघाले ते आजपर्यंत सावरलेच नाही! तशी ऐक्य वगळता सर्वच सदिच्छाचीच आपत्ये आहेत. मात्र आज याच सदिच्छाची शकलं उडत-उडत 8 ते 10 मंडळ तयार झाली आहेत.
सदिच्छाच्या सध्याच्या नेतृत्वाकडून सदिच्छाला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्याचा दावा केला जात असला तरी तसे प्रयत्न होताना कुठेच दिसत नाही! आजपर्यंत फुटून बाहेर पडलेल्या सर्व छोट्या-मोठ्या मंडळांना एकत्रित करण्याचे कोणतेच धोरण व आस नसल्याने भविष्यात आणखी काही नव्या मंडळाची निर्मिती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही!
बंडखोरीचा धोका सर्वांनाच!
गुरुमाऊलीचे तांबे व रोहोकले असे दोन गट, गुरुकुल, सदिच्छा, ऐक्य, स्वराज्य, शिक्षक भारती यासह छोट्या-मोठ्या एकूण 11 मंडळांनी निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे. आघाड्या-युत्या होताना ज्यांना संधी मिळणार नाही त्यातील अनेक शांत बसू शकत नाही. बड्या मंडळात जसा हा धोका जास्त आहे तसाच तो छोट्या मंडळांना पण राहणार आहे. यात काहींची इप्सित साध्य होतील तर काहींच्या हातावर नुसत्याच तुरी ठेवल्या जातील!
belDEOWr