श्रीगोंदा । वीरभूमी - 09-Jun, 2022, 10:25 AM
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव महसूल हद्दीतील घोडेगाव तलावाचा भराव आणि सांडवा फोडून बेकायदेशीरपणे पाईपलाईन करणारांवर कायदेशीर कारवाई करुन तलाव परिसर अतिक्रमणमुक्त करण्याच्या मागणीसाठी आढळगाव येथील ग्रामस्थांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले.
तलावातील पाणी उपसा करण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. तलावाच्या साठवण क्षमतेचा विचार न करता ही स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. भांडवलदार शेतकर्यांनी आठ ते दहा किलोमीटर अंतरावर पाणी नेले आहे. पाणी उपसा करण्यासाठी आता थेट भराव आणि सांडवा खोदण्याचे धाडस अनेकांनी केले आहे. भराव परिसरात खोदकाम करण्यास मनाई असताना हे काम सुरु असल्यामुळे आढळगाव येथील ग्रामस्थ आक्रमक झाले.
पाटबंधारे विभागाला या बेकायदेशीर कामाविषयी वेळोवेळी माहिती दिली परंतु, पाटबंधारे विभागाकडून कारवाईसाठी चालढकल सुरु होती. पाटबंधारे विभागातील कर्मचारी वर्गाचे हितसंबंध गुंतलेल्यामुळे कारवाईला फाटा दिला जात होता.
परंतु, ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग आली. संबंधितांनी काही पाईपलाईनवर कारवाई केली. सदर कारवाई निव्वळ फार्स असून संबंधितांना वाचविण्याचा खटाटोप असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मंगळवार दि. 7 रोजी आमरण उपोषणाचे आंदोलन सुरु केले.
यावेळी संजय गिरमकर, संजय मिसाळ, महादेव लाळगे, राम भालेराव, उत्तम काळे, मश्चिंद्र वडवकर, राजू सूर्यवंशी, नाना निकम, अजित होळकर, मारुती काळे, राहुल वडवकर, गणेश उबाळे, गोरख पुराणे, नितीन बिटके, अजिंक्य लाळगे, भाऊसाहेब वडवकर, नवनाथ काळाणे, आप्पा लाळगे, दिपक गिरमकर, बाळासाहेब निकम, सुभाष मिसाळ, अशोक ढवळे, अविनाश मिसाळ, उत्तम कोकणे, नवनाथ काळाणे, मारुती शिंदे यांच्यासह अन्य ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले.
पाटबंधारे विभागाकडून भराव खोदून केलेल्या पाईपलाईन निष्काषीत करुन भराव पूर्ववत करण्यात येईल तसेच तलावाचे क्षेत्राची हद्द कायम करुन अतिक्रमण काढण्याचे लेखी पाटबंधारे विभागाने दिल्यानंतर बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले.
WzBTliVJ