नशीब बलवत्तर म्हणुन वाचला आई व बाळाचा जीव
पारनेर । वीरभूमी - 09-Jun, 2022, 10:29 AM
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील कल्पना पवार ही महिला पुणे ते जळगाव प्रवास करत असताना या महिलेला नऊ महिने भरले असल्याने अचानक शिरूर दरम्यान प्रसुती वेदना सुरू झाल्या. ट्रॅव्हल्स चालक व वाहक यांनी समय सूचकता दाखवत सुपा येथील आशीर्वाद हॉटेलचे मालक निलेश पवार यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ ओंकार हॉस्पिटलचे संचालक डॉ. बाळासाहेब पठारे व डॉ. निता पठारे यांना प्रसुती वेदना सहन करणार्या महिलेचा माहिती दिली.
यावेळी मध्यरात्रीचे दिड वाजले होते. या महिलेला घेऊन ट्रॅव्हल्स हॉस्पिटल जवळ आली होती. या महिलेला खाली उतरून घेऊन हॉस्पिटल मध्ये दाखल केले. डॉ. निता पठारे यांनी समय सूचकता दाखवत या महिलेचा नॉर्मल प्रसुती केली. आणि त्या महिला व बाळाचा जीव वाचविला.
याबाबतची माहिती अशी की, पुणे ते जळगाव या ट्रॅव्हल्समध्ये चाळीसगाव येथील महिला व त्यांचे कुटुंब गावी प्रवास करत असताना महिलेला शिरूर ते कारेगाव दरम्यान प्रसूतीच्या वेदना चालु झाल्या. ट्रॅव्हल्सचे वाहक व चालक यांच्या सतर्कतेमुळे त्यांनी शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात ट्रॅव्हल्स थांबवली. परंतु मध्यरात्रीच्या साडे बारा वाजल्याने व तात्काळ प्रसुती करावयाची असल्याने तेथील डॉक्टरांनी एक तासात नगरला जाण्याचा सल्ला दिला. मात्र गाडीच्या प्रवासाने महिलेला वेदना वाढतच होत्या.
शिरूरपुढे निघाल्यावर चालक व वाहक यांनी सुपा येथील आशिर्वाद हॉटेलचे मालक निलेश पवार यांना मोबाईलवर फोन करून सविस्तर माहिती सांगितली. त्यांनी वेळ न घालवता सुपा येथील ओंकार हॉस्पिटलचे डॉ.बाळासाहेब पठारे यांना फोन करून सांगितले. तात्काळ डॉ. निता पठारे यांनी प्रसुतीची सर्व तयारी करून ठेवली. रात्री एक वाजून 20 मिनिटांनी ट्रॅव्हल्स हॉस्पिटल येथे आली.
त्यातील प्रसूतीच्या वेदना सहन करणार्या महिलेला हॉस्पिटल मध्ये दाखल करून घेतले. त्या महिलेला प्रवासामुळे प्रसुती जवळ आली होती. डॉ. निता पठारे यांनी अधिक वेळ न दवडता प्रसुतीची तयारी केली. त्या दरम्यान ट्रॅव्हल्स पुन्हा प्रवासाला निघाली.
हॉस्पिटल मधील महिलेच्या वेदना वाढतच गेल्या. या महिलेच्या जुजबी तपासण्या असताना प्रदिर्घ अनुभवावर डॉ. निता पठारे व त्यांचे मदतनीस छाया आल्हट, आरोग्य सेवक भगवान गायकवाड यांनी पहाटे साडे चार वाजता या महिलेची साधारण प्रसूती करून या महिलेचा व बाळाचा जीव वाचविला. त्यामुळे डॉ. निता पठारे व डॉ. बाळासाहेब पठारे यांचे सुपा व परिसरात कौतुक होत आहे.
Comments