पुण्या-मुंबईची ‘हाय प्रोफाइल’ संस्कृती थेट श्रीगोंद्यात पोहोचली
विजय उंडे । वीरभूमी - 16-Jun, 2022, 12:08 PM
श्रीगोंदा : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चंगळवाद वाढला आहे. विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून महाविद्यालयाभोवती कॅफे हॉटेलचे पेव फुटले असून ज्ञानार्जनाचे धडे महाविद्यालयाला दांडी मारून या कॅफे सेंटरमध्येच घेत असल्याचे विदारक चित्र श्रीगोंदा शहरात पहायला मिळत आहे.
श्रीगोंदा तालुक्याची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली असून येथील कष्टकरी शेतकरी आपल्या मुलांचे भवितव्य घडावे या हेतूने महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुलांना श्रीगोंदा येथे धाडतात. शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चंगळवाद वाढला असून नको त्या वयात चुकीचे पावले पडत आहेत. नगर दक्षिण जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात श्रीगोंद्याचे नाव आघाडीवर होते. मात्र काही विद्यार्थ्यांच्या आततायीपणामुळे शिक्षणाचा बाजार उठत चालला आहे.
श्रीगोंदा शहरात 20 ते 25 कॅफे सेंटर व हॉटेलची निर्मिती चंगळवादी विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून केली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये एकाएकी ‘प्रेमधागा’ उफाळून येतो. या प्रेमाचे उदात्तीकरण व्हावे या हेतूने कॅफे चालक त्यांच्या सेंटरचे बांधकाम करताना अधिकाधिक ‘आडोसा’ निर्माण करण्यासाठी त्यांनी कोणतीही कंजुषी ठेवली नाही असे चित्र सर्रास पहायला मिळत आहे.
मुलांचे भविष्य घडावे यासाठी शेतकरी पालक रात्रंदिवस शेतात राब राब राबतात. विद्यार्थी मात्र घरच्यांच्याच डोळ्यात अंजन घालून हजारो रूपये कथाकथीत प्रेमावर उडवतात. या मुला-मुलींकडे लक्ष देण्यासाठी पालकांना वेळ नाही. तर समाजधुरीण या विषयावर अनभिज्ञ आहेत?
दोन्ही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये गटबाजी जोरात चालू असते. विद्यार्थ्यांमध्ये ‘नाजूक’ प्रकरणांवरून अनेकवेळा गँगवार झाल्याचे तालुक्याने अनुभवले आहे. विद्यार्थ्यांमधील नाजूक प्रकरणे सर्रास झाली आहेत. या प्रकरणांना महाविद्यालयीन पातळीवर खतपाणी मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये जरब निर्माण व्हावी अशी कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही.
श्रीगोंद्यात ‘लॉज’ची संख्या झपाट्याने का वाढते?
श्रीगोंदा तालुक्यात एमआयडीसी नाही. पर्यटनाच्या निमीत्ताने तीर्थक्षेत्र नाही. श्रीगोंदा शहर मुख्य हायवेवर नाही. बाहेरून व्यापारी, व्यावसायिकांची वर्दळ थोडक्या प्रमाणात आहे. मात्र शहरात मोठ्या प्रमाणात लॉजींग बांधले जात आहेत. या लॉजींगमध्ये जे ‘चाळे’ चालतात त्यावर प्रशासनाचा कोणताही वचक नाही. भविष्यात या सर्व गोष्टी फोफावल्यास नवल वाटायला नको!!!
RDfIkTJmVvsCcl