पुढार्यांना मात्र श्रेयाची घाई । मंचर, जुन्नर, कर्जतच्या कचाट्यात श्रीगोंद्याचे झाले ‘सँडविच’
विजय उंडे । वीरभूमी - 18-Jun, 2022, 01:55 PM
श्रीगोंदा : कुकडी धरणांचा मनमुराद फायदा मंचर, जुन्नर व आंबेगाव तालुका घेतो. त्यांना अजीर्ण झाल्यावर हे पाणी आवर्तनाच्या नावाखाली सोडले जाते. मात्र त्यावेळी टेल टू हेड हा गोंडस नियम लावला जातो. कुकडीच्या कालव्यातून कर्जतकडे जाणार्या पाण्याकडे श्रीगोंदेकरांना नुसते बघत बसण्यापलिकडे श्रीगोंदेकरांच्या हाताला काहीच लागत नसल्याचे चित्र गेल्या दहा वर्षांपासून पहायला मिळत आहे.
आंबेगाव व जुन्नर तालुक्यात कुकडीची धरणे बांधले आहेत. आपसूकच धरणाच्या पाण्याचा फायदा त्यांना व्हायला पाहिजे. परंतु किती फायदा घेतला पाहिजे त्याला काही ठराविक मर्यादा आहेत. आत्ताच्या घडीला आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील ओढे नाले तुडुंब भरले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर धरणात राहिलेल्या पाण्याची त्यांची गरज संपली आहे.
या उर्वरित पाण्याचे रूपांतर सध्या कुकडीच्या आवर्तनात झाले आहे. मात्र श्रीगोंद्यातील पुढार्यांनी शेतकर्यांना डोळ्यासमोर न ठेवता मतदार केंद्रस्थानी ठेवून कुकडीच्या पाण्याचे श्रेय घेत असताना बैल गेला आणि झोपा केला असे म्हणण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
कुकडी लाभक्षेत्राखालील सगळ्या गावांची पाहणी केली असता उभे पिके तर जळालीच आहेत. शिवाय फळबागाही शेवटच्या घटका मोजत आहेत. अनेक गावांत पिण्यासाठी पाणी नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कुकडीचे पाणी थेट कर्जत - करमाळ्याला गेल्याने पावसाळ्यात पाणी येऊन खरिपाचे आवर्तन होणार आहे.
हेच पाणी एप्रिल महिन्याच्या मध्यावधीत सुटले असते तर श्रीगोंद्यातील शेतकर्यांनी नेत्यांना डोक्यावर घेतले असते. कर्जतकरांनी कुकडीच्या पाण्याचा भरपेट फायदा घेतल्यानंतर श्रीगोंद्याला द्यायचे म्हणून पाणी दिले जाते. पोटचार्या ओल्या होण्यापलीकडे शेतकर्यांच्या हाती काही लागत नाही. श्रीगोंदेकरांसाठी बोटावर मोजण्याइतक्या दिवसाचे आवर्तन ठेवले जाते. पाणी आले आले... गेले गेले... म्हणण्यापलीकडे बळीराजाच्या हातात काहीच नाही, अशी विदारक परिस्थिती श्रीगोंदेकरांची झाली आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात आघाडीवर असलेल्या मंत्र्याचा आंबेगाव मतदारसंघ आहे. त्या नेत्यापुढे श्रीगोंद्यातील नेत्यांची बोलती बंद होते. राज्यातील सरकारचा रिमोट कंट्रोल ज्यांच्या हाती आहे. त्यांचा नातवाच्या हाती कर्जतचे नेतृत्व आहे. त्यांच्या हाती श्रीगोंदा विधानसभा मतदासंघाची जबाबदारी असल्याने आमदारकीचे वेध लागलेल्या नेत्यांना शेतकर्यांऐवजी त्या नेत्याची भलावण करावी लागते.
कोट्यावधींच्या बागा जळाल्या त्याचे श्रेय कोण घेणार?
श्रीगोंदेकरांचा आवाज म्हणून कुकडीच्या प्रश्नावर कुणीच लढत नाही. याला अपवाद एकमेव राजेंद्र मस्के आहेत. वेळेवर कुकडीचे आवर्तन आले असते तर कोट्यावधी रुपयांची उभी पिके जळाली नसती. जळालेल्या पिकांची श्रेय घेण्यासाठी कुणीतरी पुढे आले पाहिजे?
NJeixfBXka