जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे आदेश
अहमदनगर । वीरभूमी - 01-Jul, 2022, 01:55 PM
गैरवर्तन व कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून एकाचवेळी जिल्ह्यातील 10 ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहेत.
या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कारवाई झालेल्यांमध्ये शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, राहाता, राहुरी, नेवासा या तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केलेल्या कारवाईमध्ये एकाला बडतर्फ, एकाला सक्तीची सेवानिवृत्ती, तिघांचे निलंबन, तर पाच जणांची वेतनवाढ ी कायमस्वरूपी थांबवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय शेवगाव येथे एकाविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
एकाच वेळी जिल्ह्यातील दहा ग्रामसेवकांवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असून ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कारवाई झालेल्यामध्ये शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव व काळेगाव, कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा, जामखेड तालुक्यातील हळगाव व खुरदैठण, पाथर्डी तालुक्यातील मिरी, राहुरी तालुक्यातील गोधेगाव, नेवासा तालुक्यातील दिघी व माळीचिंचोरा, राहाता तालुक्यातील लोणी येथील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश आहे.
Comments