गुरुजींच्या नेत्यांचा आखाडा अडीच महिने थंड!
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीस सहकार विभागाची स्थगिती
अहमदनगर । वीरभूमी - 16-Jul, 2022, 09:19 AM
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीस 30 सप्टेंबर पर्यंत स्थगिती देण्यात आल्याने गुरुजींच्या नेत्यांचा आखाडा अडीच महिने लांबणीवर गेला आहे. त्यामुळे अतिउत्साही नेते व कार्यकर्ते यांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला आहे.सततच्या पावसामुळे सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश सहकार विभागाने दिल्याने बहुचर्चित नगरच्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचे काय होणार अशी चर्चा शिक्षक वर्तुळात होती. याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यलयाने वरिष्ठांचे मार्गदर्शन मागवून सदर निर्णय घेतला आहे. बँकेसाठी 24 जुलै रोजी मतदान तर 25 जुलैला मतमोजणी होणार होती. आता ही निवडणूक 30 सप्टेंबर नंतर सध्या जी प्रक्रिया सुरू आहे त्यानुसार होईल.
आजपासून शिक्षक बँकेच्या निवडणुकीची आचारसंहिता शासन निर्णयानुसार उठविण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत ती स्थगित राहील. 30 सप्टेंबर नंतर शिक्षक बँकेची निवडणूक प्रक्रिया सध्या ज्या टप्प्यावर आहे त्यानुसारच आजच्या आदेशानुसार होईल मात्र सहकार विभागाचे याबाबत काही नवीन आदेश काढल्यास ते या निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यलयाकडून दै. वीरभूमीला देण्यात आली आहे.
बँकेत सध्या जे संचालक मंडळ सत्तेवर आहे त्यांनाच सहकार नियमानुसार अडीच महिने मुदतवाढ मिळणार आहे. ज्या आदेशानुसार निवडणुकीस स्थगिती मिळाली आहे त्यानुसार प्रशासक नेमण्याचा नियम लागू होत नाही. मात्र याबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शन मागवून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी अवघ्या आठ दिवसांचा कालावधी उरला होता. प्रचाराचे साहित्य छापून तालुकानिहाय त्याचे वाटपही सर्व मंडळांनी केले होते. पण आता शासनाने अचानक निवडणुकीच्या स्थगितीचे आदेश दिल्याने उमेदवारांना नवीन तारीख जाहिर झाल्यावर परत नव्याने प्रचार साहित्य छापावे लागणार आहे. यात श्रम व पैसे दोन्ही वाया जाणार आहेत.
विकास मंडळाच्या निवडणुकीबाबत आज निर्णय
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीस 30 सप्टेंबर पर्यन्त स्थगिती मिळालेली असताना या निवडणुकी सोबतच होणार्या जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या निवडणुकी संदर्भात काय निर्णय घ्यायचा याबाबत शनिवारी (दि.16) धोरण निश्चित केले जाईल, अशी माहिती विकास मंडळ निवडणूक अधिकर्यांनी दिली. विकास मंडळ ही धर्मदाय आयुक्त यांच्याकडील नोंदणीकृत संस्था असल्याने तिला सहकार विभागाचे निर्णय लागू होत नाही. मात्र,दरवेळी शिक्षक बँक व विकास मंडळ या दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेण्यात येत असल्याने याबाबत चर्चा करून आज निर्णय होणार आहे.
शिक्षक बँकेची निवडणूक कोर्टात?
प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक ठरलेल्या वेळेतच व्हावी यासाठी शिक्षक बँकेच्या वर्तुळातील काही जण कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या रविवारी होणार होती, त्याची पूर्ण तयारी पण झालेली आहे त्यामुळे त्याबाबत त्वरित कोर्टात जाण्याचा निर्णय घेऊन परवा मतदान असल्याने त्यावर शनिवारी लगेच सुनावणी होणार आहे. त्यामुळे या याचिकेचा निकाल काय लागतो याकडे शिक्षक वर्तुळाचे लक्ष लागून असून या याचिकेच्या आधारे शिक्षक बँकेची याचिका काही जण दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
निवदावरचे नेते हिरमुसले
शिक्षक बँकेची निवडणूक स्थगित झाल्याने शिक्षक बँकेच्या वर्तुळातील निवदावरचे नेते मात्र चांगलेच हिरमुसले आहेत. उमेदवारी मिळवून देण्यासाठी सदर उमेदवाराकडून खर्चाची सोय, परत निवडणुकीत प्रचारासाठी मंडळ व उमेदवार दोघांकडून वेगळी बिदागी, हॉटेलचे चमचमीत जेवण, स्वतःची गाडी घरी झाकून ठेवून प्रचारात फिरायला चारचाकी गाडी, असा सगळा फुकटचा डामडोल अडीच महिने बंद राहणार असल्याने असे निवदावर टपलेले नेते चांगलेच हिमुसले आहेत!
पाथर्डीची लापशी आंबट
पाथर्डीत एका मंडळाच्या प्रचाराचा नारळ शुक्रवारी संध्याकाळी फुटणार होता. त्यासाठी नगरहून मंडळाचे नेते पण येणार होते. येणार्या सर्वांसाठी लापशी व कढी भात असा मस्त जेवणाचा बेत आखण्यात आला होता. मात्र अचानक निवडणूक स्थगित झाल्याने नेतेही आले नाहीत व प्रचार नारळ पण फुटला नाही. पण जेवणाची ऑर्डर आधीच दिलेली असल्याने सदर उमेदवारास सर्वाना बोलावून जेवू घालण्याची वेळ आली अन सर्वाना गोड लागलेली लापशी निवडणूक स्थगित झाल्याने सदर उमेदवाराला मात्र आंबटच लागली!
त्यांचे ’दोडके’ झाले
ज्यांनी तिकीट न मिळाल्याने रागातून मंडळ सोडली त्यांना आता जुन्या मंडळातील लोकांकडून राम राम बंद झाला आहे व निवडणूक लांबणीवर गेल्याने अडीच महिने नवीन मंडळ फुकट पोसणार नाही त्यामुळे मंडळ बदलणारा हा ‘ना घर का ना घाट का’ झाला आहे. तसेच अजुनही काही नाराज नेते घरीच बसून होते. त्यांची नाराजी नेते पण दूर करत नव्हते मग आता अडीच महिने काय करायचं? असा प्रश्न त्यांच्या समोर असून त्यांना दोडक्या सारखे अधांतरी लटकावे लागत आहे.
गुरुमाऊलीच्या दोन्ही गटाची तथाकथित बैठक अन
शिक्षक बँकेची निवडणूक स्थगित झाल्यामुळे आता बँकेत नवीन पदाधिकारी निवडीसाठी गुरुमाऊलीच्या सत्ताधारी तांबे व विरोधी रोहोकले गटाची एकत्रित बैठक नगर-कल्याण रोडवर झाल्याची पुडी यांच्यातूनच फुटलेल्या तिसऱ्या गटाच्या एका नेत्याने पत्रकारांजवळ सोडली! पेपर मध्ये नाव छापून येण्याची भारी हौस असलेल्या या नेत्याची सोलकढी पत्रकारांच्या लगेच लक्षात आल्याने तुम्हाला त्यात वाटा मिळणार नसल्याने तुम्ही अस्वस्थ आहात का? अशी प्रति गुगली पत्रकारांनी टाकल्यावर या 'ताप'दायक नेत्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता!
Tags :
Comments