जप्त वाळू डंपर परत करण्यासाठी केली लाखाची मागणी । 50 हजार रुपये घेतांना लाचखोर महसूल लिपिक जाळ्यात
शेवगाव । वीरभूमी - 27-Jul, 2022, 09:45 PM
शेवगाव तालुका आणि वाळू तस्करी तशी नवी गोष्ट नाही. प्रशासनातील अनेक अधिकारी वाळू हप्तेखोरीसाठी प्राधान्याने शेवगावात येतात. मात्र या वाळूने अनेकांचा घात केला आहे. अशाप्रमाणे आज बुधवारी 2020 साली जप्त केलेला वाळूचा डंपर तक्रारदाराला परत करण्यासाठी एक लाखाची मागणी करत त्यातील 50 हजार रुपये स्विकारतांना शेवगाव तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकास नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडला.
महसूल सहाय्यक कर्मचार्याचे नाव हरेश्वर रोहिदास सानप (वय 36, नेमणूक - शेवगाव तहसील कार्यालय) असे आहे. या घटनेने शेवगावसह तालुक्यात एकच खळबळ उडाली. या लाचखोरीत अजुन कोणाचा सहभाग आहे याची पूर्ण शहानिशा केल्यानंतर एकटा महसूल सहाय्यकच यात दोषी असल्याचे समोर आले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव येथील 24 वर्षीय तक्रारदाराचा अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर सन 2020 मध्ये पकडून तो जप्त करत शेवगाव पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला होता. जप्त करण्यात आलेला वाळूचा डंपर परत मिळण्यासाठी तक्रारदार यांनी न्यायालयात अर्ज केला होता.
याप्रकरणी न्यायालयाने तहसीलदार यांचेकडे अहवाल मागवला होता. न्यायालयात सादर करण्यात येणारा अहवाल हा तक्रारदार यांच्याबाजुने तयार करुन देण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक हरेश्वर रोहिदास सानप (वय 36) यांनी तक्रारदार यांचेकडे एक लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.
या लाचेतील पहिला टप्पा 50 हजार रुपये स्विकारतांना महसूल सहाय्यकास नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधिक्षक एन. एस. न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. प्रकाश महाजन, पोना. मनोज पाटील, चालक पोहवा. उमेश पाटील यांच्या पथकाने केली.
Comments