गटनेते मनोहर पोटे यांना हटवून गणेश भोस यांची वर्णी
श्रीगोंदा । वीरभूमी- 05-Sep, 2022, 11:09 PM
श्रीगोंदा नगरपरिषदेचे गटनेते व नगराध्यक्षापती मनोहर पोटे यांना त्यांच्याच जवळच्या विश्वासू सहकारी नगरसेवकांनी धक्का दिला आहे. पोटे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत त्यांना गटनेते पदावरून हटवत गणेश भोस यांची गटनेतेपदी बहुमताने नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र आज नगरसेविका सीमा गोरे, नगरसेविका सोनाली घोडके, नगरसेवक संतोष कोथिंबीरे, नगरसेवक निसार बेपारी, नगरसेवक गणेश भोस या पाच जणांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
गटनेते मनोहर पोटे हे मनमानी कारभार करत आहेत. सहकारी नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. कोणतेही निर्णय बहुमताने घेतले जात नाहीत. गटविरोधी कारवाया केल्या जातात. गटनेत्यांवर वैयक्तिक अर्ज व तक्रारी दाखल झाल्या असून अशा परिस्थितीत त्यांनी गटनेतेपदी राहणे हे बहुमताच्या विरुद्ध आहे. याबाबत बैठक घेण्यात आली. त्याला देखील गटनेते मुद्दाम गैरहजर राहिले.
त्यामुळे त्या बैठकीत बहुमताने गटनेता बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गणेश भोस यांची श्रीगोंदा नगरपरिषदेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे आज नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
श्रीगोंदा नगरपरिषदेत भाजपचे बहुमत असले तरी काँग्रेसच्या शुभांगी पोटे या लोकनियुक्त नगराध्यक्षा आहेत. नगरपरिषदेत सत्ता आल्यापासून विरोधी आणि सत्ताधारी नगरसेवक एकत्रित येऊन काम करत होते. कुठेही कधी फारसा विरोध पाहायला मिळाला नाही. परंतु आज पोटे यांच्या विश्वासू सहकारी नगरसेवकांनीच त्यांना गटनेते पदावरून हटवल्याचे पत्र दिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आपण नगरसेवकांना विश्वासात घेत नाही हे कारण चुकीचे आहे. मागील साडेतीन वर्षांत सर्वात जास्त निधी गणेश भोस यांच्या वार्डात दिलेला आहे. राजाभाऊ लोखंडे व संगीता मखरे हे दोन नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आहेत, तरी ते आपल्यासोबत आहेत. आणि काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले विरोधात गेले आहेत.
त्या सर्व नगरसेवकांच्या नाराजीचे कारण वेगळे आहे. कारण येणारे वर्ष तालुक्यातील अनेक संस्थात्मक निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. त्याचीच ही परिणीती आहे. योग्यवेळी पुराव्यासह आपण उत्तर देऊ. यापुढे देखील मीच गटनेतेपदी राहणार असल्याचा विश्वास नगरसेवक मनोहर पोटे यांनी वीरभूमीशी बोलताना व्यक्त केला.
zTFuURqoDB