एकजण जखमी । नगर-सोलापूर महामार्गावरील मांदळी जवळील घटना
मिरजगाव । वीरभूमी- 05-Sep, 2022, 11:41 PM
मालट्रक व स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारार्थ नेत असताना मृत्यू झाला असून एकजण गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ नगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हा अपघात अहमदनगर - सोलापूर राज्य महामार्गावरील मांदळी जवळ आज दि. 5 रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नगर-सोलापूर राज्य महामार्गावरून नगरच्या दिशेने जाणार्या मालट्रक क्रमांक टी.एन.28, ए.एम. 4189 व घोगरगावहून थेरगावच्या दिशेने येत असलेल्या स्विफ्ट कार क्रमांक एमएच.04, डीएन. 3341 या दोन्ही वाहनांचा मांदळीजवळ भीषण अपघात झाला.
या अपघातात स्विफ्ट कार मालट्रकच्या समोरील बाजूस व महामार्गावरील दुभाजकावर जोराने आदळल्याने स्विफ्ट कारचे इंजन रस्त्याच्या बाजूला फेकले गेले.
अपघातातील मृतांची नावे निळकंठ रावसाहेब माने (वय 30), शरद शोभाचंद पिसाळ (वय 27), धर्मराज लिंबाजी सकट (वय 27) (सर्वजण रा. थेरगाव, ता. कर्जत) अशी आहेत. तर जखमीमध्ये सोनू विक्रम सकट (रा. थेरगाव, ता. कर्जत) याचा समावेश आहे.
या अपघाताची माहिती मिळताच मिरजगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर येथील ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यासाठी मदत केली. हा घडलेला अपघात एवढा भीषण होता की या अपघातात स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला आहे.
अपघातग्रस्त स्विफ्ट कारमध्ये कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील चौघेजण मित्र स्विफ्ट कारमधून गावाकडे येत होते. या अपघातामुळे थेरगाव गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताचा अधिक तपास पो.हे.कॉ.सतिष बचाणे हे करत आहेत.
Comments