विजय उंडे । वीरभूमी - 06-Sep, 2022, 12:06 AM
श्रीगोंदा : परभणी जिल्ह्यातील श्री लक्ष्मीनरसिंह शुगर्स एल.एल.पी. अमडापूर या कारखान्याच्या चेअरमन व अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांना भारतीय शुगर इंडस्ट्रीजचा प्रतिवर्षी दिला जाणारा ‘वुमेन आयकॉन’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार बुधवार दि. 7 सप्टेंबर रोजी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे व उपाध्यक्ष डी. एम. रासकर यांनी दिली आहे.
1975 ची स्थापना असलेली भारतीय शुगर संस्था राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांची समन्वयक व मार्गदर्शक म्हणून काम करीत आहे. अहमदनगर जिल्ह्याचे स्व. शंकरराव कोल्हे, स्व. शिवाजीराव नागवडे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी या संस्थेच्या अध्यक्षपदी काम केलेले आहे.
विद्यमान चेअरमन म्हणुन विक्रमसिंह शिंदे कार्यरत असून महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी मंत्री जयंतराव पाटील, जयंतीभाई पटेल, अमित कोरे, सत्यशिल शेलकर, साखर आयुक्त शेखर गायकवाड, एन.एस.आय. कानपूरचे संचालक नरेंद्र मोहन, यशवंतराव चव्हाण साखर संशोधन संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख व मान्यवर कौन्सील सदस्य म्हणुन काम करीत आहेत.
सहकारी व खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्यांच्या विविध समस्या सोडविणे, त्यांना मार्गदर्शन करणे व साखर कारखान्यांच्या यशस्वीतेसाठी सातत्याने काम करणारी ही संस्था दरवर्षी साखर व्यवसायातील यशस्वी व्यक्तीस सन्मानपुर्वक पुरस्कार देवून त्यांना प्रोत्साहन देत असते. यावर्षी 2022 च्या पुरस्काराकरीता परभणी येथील श्री लक्ष्मीनरसिंह शुगरच्या चेअरमन व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांची निवड करणेत आलेली आहे.
सौ. नागवडे यांनी परभणी येथील बंद पडलेला त्रिधारा शुगर, अमडापूर हा 2500 मे.टन क्षमतेचा खाजगी साखर कारखाना विकत घेवून त्याचे श्रीलक्ष्मीनरसिंह शुगर्स असे नामकरण केले. गेल्या पाच वर्षामध्ये यशस्वीरित्या गाळप करुन कारखाना परिसरातील शेतकर्यांना योग्य प्रकारे न्याय दिलेला आहे. सन 2021-22 मध्ये या कारखान्याने 6,31,310 मे.टन गाळप केले असुन येत्या हंगामात 9 लाख मे. टन ऊस गाळप करण्याचा त्यांचा मानस आहे.
सौ. नागवडे यांनी साखर व्यवसायात दिलेले महत्वपूर्ण योगदान व त्यामाध्यमातून कारखाना परिसराचा झालेला सर्वांगीण विकास, कामगारांचे मार्गी लागलेले प्रश्न यामुळे त्यांना भारतीय शुगरतर्फे ‘वुमन आयकॉन ऑफ इंडियन शुगर इंडस्ट्री अॅवार्ड 2022’ जाहीर झाला आहे.
दि. 7 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वा. हॉटेल हयात रिजन्सी, विमाननगर, पुणे येथे राज्याचे माजी मंत्री प्रकाश आवाडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, भारतीय विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शिवाजीराव कदम, राज्य साखर संघाचे संचालक राजेंद्र नागवडे, भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाचे सहसेक्रेटरी संजीब पटजोशी आदी मान्यवरांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
सौ. नागवडे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, नागवडे कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस, लेबर फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष अनिल पाचपुते, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे, नागवडे कारखान्याचे संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.
tckzAJwNHXUGje