बोगस मतदानावरुन पिचड-भांगरे यांच्यात बाचाबाची
अगस्ति कारखान्यासाठी 85 टक्के मतदान । आज मतमोजणी
अकोले । वीरभूमी - 25-Sep, 2022, 11:46 PM
अकोले अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत बोगस मतदानावरून शेंडी येथील मतदान केंद्रावर पिचड पितापुत्र आणि भांगरे पितापुत्र व त्यांचे समर्थक यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. बोगस मतदानास जबाबदार असणार्या अधिकार्यावर कारवाई करावी. तसेच या मतदान केंद्रावर फेरमतदान घ्यावे, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली आहे. शेंडी मध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असुन परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे.दरम्यान प्राथमिक अंदाजानुसार अगस्ती कारखाना निवडणुकीत 85 टक्के मतदान झाले असावे, असा अंदाज आहे. शेंडी मतदान केंद्रात बोगस मतदान होण्याची शक्यता आहे, असा अर्ज पिचड गटाच्या प्रतिनिधींनी दिला होता. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही, असा आरोप आहे.
एका मयत महिलेच्या नावावर मतदान झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पिचड गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या केंद्रात बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप करीत या कार्यकर्त्यांनी यास जबाबदार असणार्या अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी केली. हा वाद नंतर वाढत गेला. माजी मंत्री मधुकरराव पिचड, त्यांचे पुत्र माजी आमदार वैभवराव पिचड आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते तसेच माजी जि. प. अध्यक्ष अशोकराव भांगरे, त्यांचे पुत्र अमित भांगरे आणि समर्थक तेथे जमा झाले.
दोन्ही गटात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. पोलीस बंदोबस्त असल्यामुळे काही अनर्थ घडला नाही. या मतदान केंद्रात बोगस मतदान तसेच अन्य गैरप्रकार झाले असल्याचा आरोप आहे. बोगस मतदानास जबाबदार असणार्या अधिकार्यावर निलंबनाची कारवाई करावी, या संपूर्ण गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, तसेच या मतदान केंद्रावर फेर मतदान घ्यावे, अशी मागणी माजी मंत्री श्री.पिचड यांनी केली आहे.
अन्य केंद्रात कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान पार पडले. 23 मतदान केंद्रात सकाळी मतदानास सुरुवात झाली.दुपारी दोन वाजेपर्यंतच 71 टक्के मतदान झाले होते.
एकुण 8 हजार 392 मतदारांपैकी 5 हजार 927 मतदारांनी मतदानाचा हक्क तोपर्यंत बजावला होता.त्या नंतरही मतदानाचा वेग सुरूच होता. शेंडी मतदान केंद्रावर सुरू असणार्या घोळामुळे मतदानाचा अंतिम आकडा उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र 85 टक्के मतदान झाले असावे असा अंदाज आहे.नियोजना प्रमाणे उद्या मतमोजणी होणे अपेक्षित आहे.
शेंडी मतदान केंद्रावर झालेल्या बोगस मतदान बाबत झोनल अधिकारी यांना संबधित व्यक्तीवर पोलिस स्टेशनला गुन्हे नोंदविण्यात येणार आहे. तसेच जे मतदान केंद्र अधिकारी यांच्या उपस्थितीत बोगस मतदान झाले त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. फेर मतदान बाबत न्यायालयात जाण्यासाठी शेतकरी विकास मंडळाला कागदपत्रे दिले जातील. मात्र न्यायालयाच्या आदेशाने मतदान प्रक्रिया झाली असून उद्या अकोले येथे मतदान मोजणी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी. जी. पुरी यांनी दिली.
सकाळपासून मतदान करताना समृध्दी मंडळाने दबाव आणून मतदान घडविले. आम्ही चार वेळा हस्तक्षेप करूनही ते ऐकत नव्हते. त्यांनी अधिकार्यांना पार्टी देऊन अधिकारी मॅनेज केले होते. त्यामुळे शेंडी केंद्रावर सकाळपासूनच बोगस मतदान झाले असल्यामुळे संबधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी व फेर मतदान घ्यावे, अशी मागणी मतदार भरत घाणे यांनी केली.
रविवारी मतदान झाल्यानंतर आज सोमवारी सकाळी 9 वाजता अकोले महाविद्यालयाच्या के. बी. दादा सभागृहात मतमोजणी होणार आहे.
सायंकाळी उशीरापर्यंत शेंडी मतदान केंद्रावरचा वाद सुरु असल्याने एकुण मतदानाची आकडेवारी उपलब्ध झाली नसल्याने दुपारी 3 वाजेपर्यंत 70 टक्के मतदान झाले होते ते बुथ निहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे -
1) अगस्ती विद्यालय, अकोले एकुण 406 पैकी 265, 2) अगस्ती विद्यालय, अकोले- 407 पैकी 306, 3) अगस्ती विद्यालय, अकोले - 388 पैकी 252, 4) प्रवरा विद्यालय, इंदोरी -406 पैकी 263, 5) प्रवरा विद्यालय, इंदोरी - 400 पैकी 261, 6) प्रवरा विद्यालय, इंदोरी- 375 पैकी 255, 7) प्रवरा विद्यालय, इंदोरी -317 पैकी 223, 8) सर्वोदय विद्या मंदिर, राजुर - 403 पैकी 275, 9) प्रवरा विद्यालय, इंदोरी - 410 पैकी 282, 10) उन्नती मंडळ आश्रमशाळा शेंडी-375 पैकी 287,
11) उन्नती मंडळ आश्रमशाळा शेंडी- 356 पैकी 232, 12) अगस्ती विद्यालय अकोले -336 पैकी 258, 13)अगस्ती विद्यालय, अकोले- 357 पैकी 254, 14) अगस्ती विद्यालय, अकोले- 396 पैकी 293, 15) शासकीय आश्रमशाळा, कोहणे - 413 पैकी 330, 16) जिल्हा परिषद शाळा, कोतुळ -445 पैकी 270, 17) जिल्हा परिषद शाळा, कोतुळ - 461 पैकी 330, 18) जिल्हा परिषद शाळा, धामणगाव पाट,-350 पैकी 278, 19)जिल्हा परिषद शाळा, समशेरपुर- 264 पैकी 186, 20)जिल्हा परिषद शाळा, समशेरपुर- 259 पैकी 189, 21)जिल्हा परिषद शाळा, देवठाण- 424 पैकी 315, 22)जिल्हा परिषद शाळा, देवठाण- 394 पैकी 282, 23)अगस्ती महाविद्यालय, अकोले- 50 पैकी 41 असे दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान झालेले होते.
aweDOqinh