देश पातळीवरील विरोधी पक्ष श्रीगोंद्यात एकत्र
श्रीगोंद्यात लोकनियुक्त नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावासाठी काँग्रेस-भाजपाची सहमती एक्सप्रेस
श्रीगोंदा । वीरभूमी - 04-Nov, 2022, 11:43 PM
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांना पदावरून हटवण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. थेट जनतेतुन निवडून आलेल्या काँगेसच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांचा अजून चौदा महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना व लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव दाखल होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.देश पातळीवर विरोधी असलेले काँग्रेस व भाजपा पक्ष श्रीगोंदा नगरपरिषदेत नगराध्यक्षाविरोधात एकत्र आले आहेत. काँगेस व भाजपाच्या नगरसेवकांनी हात मिळवणी करत काँग्रेसचे नगरसेवक गणेश भोस यांनी 16 नगरसेवकांचा पाठिंबा घेत शुक्रवार दि. 4 रोजी जिल्हाधिकार्यांकडे नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे.
या अविश्वास ठरावावर सत्ताधारी काँग्रेसचे 5 व विरोधी भाजपचे 11 अशा एकूण 16 नगरसेवकांच्या सह्या आहेत. तर काँग्रेसच्या विद्यमान नगराध्यक्षा शुभांगी पोटे, त्यांचे पती नगरसेवक मनोहर पोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संगीता मखरे व राजाभाऊ लोखंडे या ठरावापासून अलिप्त आहेत.
ठराव दाखल करणार्या नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, नगराध्यक्षा मनमानी कारभार करत असून नगरसेवकांमध्ये दुजाभाव करत आहेत. कारभार करतांना विश्वासात न घेता नगरपरिषदेच्या अनेक कामात अनियमितता व भ्रष्टाचाराची प्रकरणे घडत आहेत, असे जिल्हाधिकार्यांकडे केलेल्या अर्जात म्हटले आहे.
श्रीगोंदा नगरपरिषदेत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे 8 तर भाजपचे 11 नगरसेवक असून नगराध्यक्षा शुभांगी पोटे या काँग्रेसच्या चिन्हावर नगराध्यक्ष म्हणुन जनतेतून निवडून आलेल्या आहेत. श्रीगोंदा नगरपरिषदेत काही दिवसांपासून राजकीय अस्थिरता निर्माण होऊन काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी नगराध्यक्षापती व काँग्रेसचे नगरसेवक मनोहर पोटे यांना गटनेते पदावरून हटवून गणेश भोस यांनी गटनेतेपद मिळवले होते.
परंतु काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी बंड पुढे रेटत त्यांनी विरोधी भाजपच्या 11 नगरसेवकांबरोबर सहमती एक्स्प्रेस करत चक्क नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे. या दोन विरुद्ध टोकांच्या युतीमुळे येणार्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यात मोठ मोठे राजकीय भूकंप घडणार आहेत.
श्रीगोंदा पालिकेत भाजपाचे 11, काँग्रेसचे 6, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 व काँग्रेसच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा शुभांगी पोटे असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षा पोटे यांचा अजून चौदा महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. आगामी नगरपरिषदेची निवडणूक जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. तत्पूर्वीच गेल्या काही महिन्यांपासून काँगेस गटात धुमसत असलेल्या राजकीय संघर्षात महविकास आघाडीच्या धर्माला तिलांजली देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना अलगद बाजुला ठेवत व माजी आमदार राहुल जगताप व प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांना अनभिज्ञ ठेवत भाजपा व काँग्रेसचे नगरसेवक एकत्र येऊन नवीनच राजकीय समीकरण तयार होत आहे. या सर्व घडामोडीला मुंबईतील शिंदे - फडणवीस सरकारचा आशीर्वाद असल्याची खमंग चर्चा तालुक्यात रंगली आहे. आगामी काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद व दोन वर्षांनंतर विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.
शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी व नव्याने एकनाथ शिंदे यांचा गट अशी बर्याच प्रमाणात समान बलाबल असणार्या पक्षांत लढती होणार आहेत. कोण कोणाबरोबर युती, आघाडी करेल हे भविष्यकारही सांगू शकणार नाहीत, अशी आजची परिस्थिती आहे.
तालुक्यातील एका काँग्रेसच्या मातब्बर नेत्याने एका माजी मंत्र्याशी सलगी वाढवत भाजपात प्रवेशासाठी मुहूर्त शोधण्यास प्रारंभ केला आहे. त्यातच नगरपालिकेच्या राजकारणात काँग्रेसच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्यावर अविश्वास दाखल करण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांना सोबत घेत जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. काँग्रेस - भाजपाची श्रीगोंद्यातील सहमती एक्सप्रेस ही आगामी विधानसभेची नांदीच म्हणावी लागेल.
Comments