या कारणाने श्रीगोंदा नगराध्यक्षांवर अविश्वासाचे बालंट
विजय उंडे । वीरभूमी - 08-Nov, 2022, 09:41 AM
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्यावर काँग्रेस भाजपच्या नगरसेवकांनी हातमिळवणी करत अविश्वास ठराव आणला आहे. त्यांच्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष करून व राज्यातील पहिलाच सहकारी साखर कारखाना मुख्यमंत्र्यांच्या गटाचा करत आगामी विधानसभेची उमेदवारी भाजप - शिंदे गटाच्या तडजोडीतून शिंदे गटाकडून मिळवण्यासाठी तालुक्यातील एका नेत्याने उमेदवारीचे फासे टाकले असून मुख्यमंत्र्यांची गुप्तरीत्या एका नेत्याने भेट घेतली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षा बदलाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. त्याला किनार आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदराव पवार यांनी नुकताच श्रीगोंदा तालुक्याचा दौरा केला. त्यांच्या कुटुंबातील घटक असलेल्या विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व आ. रोहित पवार यांनी श्रीगोंदा तालुक्याचा दौरा करत तालुक्यातील दुसर्या व तिसर्या फळीतील नेत्यांशी संपर्क वाढवला आहे.
आगामी विधानसभेची श्रीगोंद्यातील जागा राष्ट्रवादी सोडणार नाही. व राष्ट्रवादीची उमेदवारी आपल्याला मिळणार नाही या हेतूने या काँग्रेसी नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी घरोबा करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या नेत्याने पत्नी समवेत नुकतीच मुंबईत भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाच्या पाठीशी राज्यातील पहिलाच साखर कारखाना व श्रीगोंद्याचे नगराध्यक्ष उभे करतो अशी बतावणी करत मुख्यमंत्र्यांनी या बाबीला हिरवा कंदिल दाखवल्याने लागलीच श्रीगोंद्यात येत श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षावर अविश्वास दाखल केला आहे.
श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा बंद पडलेला साखर कारखाना त्यातुन त्यांची झालेली आर्थिक पडझड व त्यांच्या प्रकृतीच्या कारणाचा पाढा वाचत ते आगामी विधानसभेचे उमेदवार कसे होऊ शकत नाहीत याची मिमांसा या नेत्याने मुख्यमंत्र्यांपुढे केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाकडून उमेदवारीचा शब्द दिल्याने या नेत्याचा वारू सुसाट सुटला आहे. उमेदवारीच्या शब्दापायी श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षाचा पहिला राजकीय बळी दिला जाणार आहे.
श्रीगोंद्याचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांचे श्रीगोंदा शहरात वाढते प्राबल्य तसेच नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी नगराध्यक्ष झाल्यानंतर तालुकाभर वाढवलेला जनसंपर्क व तालुक्यातील छोट्या मोठ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावल्याने काही नेत्यांनी याचा धसका घेत त्यांच्यावर अविश्वासाचे बालंट आणले आहे.
पर्यायी नेतृत्व तयार होऊ नये यासाठी ही अविश्वासाची खेळी खेळल्याचे आता लपून राहिले नाही. विधानसभेची उमेदवारी मिळवताना मनोहर पोटे आपल्या पाठीशी त्यांची ताकद उभी करणार नाहीत या भीतीने या नेत्याने हे डावपेच सुरू केले आहेत.
JSbaZeIMKsOG