आ. रोहित पवार यांचा आ. राम शिंदे यांना इशारा । मागील दाराने आल्याचा केला उल्लेख
अहमदनगर । वीरभूमी- 10-Nov, 2022, 02:25 PM
कर्जत-जामखेड मतदार संघातील 60 कोटी खर्चाच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांची वर्क ऑर्डर निघून तीन महिण्याचा कालावधी लोटला तर राजकीय विरोध अधिकारी व ठेकेदारावर दबाव आणुन आडकाठी आणत आहेत. या कारणावरुन आ. रोहित पवार यांनी ट्विट करुन आ. राम शिंदे यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.
आ. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘मागील दाराने येऊन’ दबावाचे राजकारण करत असल्याचे म्हणत आ. राम शिंदे यांच्यावर टीका केली आहे. यामुळे कर्जत-जामखेड मधील राजकारण ‘पाणी योजनावरुन’ पेटणार असल्याचे दिसत आहे.
याबाबत आ. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, तहानलेल्याला पाणी देणं, यासारखं पुण्याचं दुसरं काम नाही. पण जबाबदारी असतानाही ज्यांनी वर्षानुवर्षे माझ्या मतदारसंघाला तहानलेलं ठेवलं तेच राजकीय विरोधक मी आमदार म्हणून मंजूर केलेल्या कोंभळी, मिरजगाव, खर्डा इथल्या 60 कोटीच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामाला आडकाठी आणत आहेत.
कोंभळी, मिरजगाव, खर्डा येथील पाणीपुरवठा योजनांच्या कामाची वर्क ऑर्डर देऊन 3 महिने झाले तरी स्वतःच्या हाताने भूमिपूजन व्हावं म्हणून कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकार्यांवर दबाव आणला जातोय. यापूर्वीही मी मंजूर करून आणलेल्या अनेक कामांनाही त्यांनी सरकारकडून स्थगिती आणली. असा आरोप आ. रोहित पवार यांनी केला आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, शिवाय जामखेड शहराची नळपाणीपुरवठा आणि भूमिगत गटार योजना मंजूर असतानाही पुढील कार्यवाही रोखण्यासाठी मंत्र्यांवरही दबाव आणला जातोय. पण त्यांना माहीत नाही, की हे दबावाचं राजकारण कर्जत-जामखेडकरांनी तीन वर्षांपूर्वीच धुळीला मिळवलं आहे, असा टोला लगावला.
तरीही ‘मागील दाराने’ येऊन कुणी दबावाचं राजकारण करत आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेच्या हक्काचं पाणी रोखत असेल तर आम्ही अशांच्या तोंडचं पाणी पळवल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा इशाराही आ. रोहित पवार यांनी आ. राम शिंदे यांचे नाव न घेता दिला आहे.
payXHVZgGxmtWC