महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जिल्ह्यातून या पैलवानांची निवड
माती विभागात पै. योगेश पवार तर गादी विभागात पै. सुदर्शन कोतकर
अकोले । वीरभूमी- 29-Nov, 2022, 10:08 AM
अकोले तालुका तालीम संघ व अहमदनगर जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भाजपचे अनुसूचित जन जाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आ. वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले येथे 65 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरीसाठी अहमदनगर जिल्ह्यातून निवड चाचणी स्पर्धा रात्री उशिरापर्यंत पार पडली. अटीतटीच्या स्पर्धेमध्ये गादी विभागात पै. सुदर्शन कोतकर तर माती विभागात पै. योगेश पवार यांची अहमदनगर जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरी गटासाठी निवड झाल्याची माहिती बबलू धुमाळ यांनी दिली.दि. 27 व दि 28 रोजी या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन माजी आ. वैभवराव पिचड यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाले. यावेळी अॅड. के.डी. धुमाळ, शिवाजीराजे धुमाळ, अमृतसागर दूध संघाचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, नगराध्यक्ष सौ.सोनाली नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उद्योजक राजाभाऊ गोडसे, राहूल देशमुख, तालीम संघाचे जिल्हा अध्यक्ष वैभव लांडगे, अकोले तालुकाध्यक्ष बबलू धुमाळ, उपाध्यक्ष श्याम शेटे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक, अहमदनगर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील तालीम संघाचे तालुकाध्यक्ष, अकोलेचे सर्व नामवंत पैलवान उपस्थित होते.
गादी व माती विभागातील निवड चाचणी साठी 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92 व 97 या वजन गटामध्ये मल्ल एकमेकाला भिडले.काहींनी आपल्या स्पर्धकाला चितपट केले तर काहींनी गुणांवर विजय मिळविला. त्यांना माजी आमदार वैभवराव पिचड व इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वाटण्यात आले.
65 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तथा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धसाठी अहमदनगर जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा अकोले येथे पार पडल्या. माजी आमदार वैभवराव पिचड यांनी व इतर मान्यवरांनी निवड झालेल्या सर्व विजेत्या पैलवानांचे हार्दिक अभिनंदन करून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकरीता हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बबलू धुमाळ, श्याम शेटे, बाबासाहेब नाईकवाडी, संतोष देठे, अनिकेत कडलग, संकेत शेटे, संतोष घोलप, यश मोरे, संदीप एलमामे, अथर्व गायकवाड, राहुल तपासे, रामेश्वर धुमाळ, अजिंक्य कदम, माळवे यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी जिल्हा तालीम संघाने जो विश्वास अकोलेकरांवर टाकला त्याचे सुंदर नियोजन करून तो विश्वास सार्थ ठरविला.
या स्पर्धेसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांचे आणि ज्या ज्या व्यक्तींचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे अकोले तालीम संघाचे तालुकाध्यक्ष बबलू धुमाळ व सदस्य यांनी आभार मानले.पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी या स्पर्धेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवून विशेष सहकार्य केले. या कुस्ती स्पर्धेचे सुंदर निवेदन अनुभवी शंकरराव पुजारी यांनी करून सर्वांचे मने जिंकली.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू खालीलप्रमाणे,
माती विभाग (कंसात वजनगट) ः शुभम लांडगे (57), अक्षय औटी (61), लक्ष्मण धनगर (65), सौरभ मराठे (70), ऋषीकेश शेळके (74), धुळाजी इरकर (79), आण्णा गायकवाड (86), अनिल लोणारी (92), युवराज चव्हाण (97). तर महाराष्ट्र केसरी गटात योगेश पवार यांची निवड करण्यात आली.
गादी विभाग (कंसात वजनगट) ः अभिजित वाघुले (57), ऋषीकेश उचाळे (61), गणेश शेटे (65), संदीप लटके (70), महेश फुलमाळी (74), आकाश घोडके (79), ऋषीकेश लांडे(86), तुषार सोनवणे (92), अनिल ब्राम्हणे (97), तर महाराष्ट्र केसरी गटासाठी सुदर्शन कोतकर यांची निवड करण्यात आली.
Tags :
HuJEwjpQAg