पाथर्डी । वीरभूमी - 06-Dec, 2022, 03:06 PM
अहमदनगर जिल्ह्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 61 अहमदनगर-पाथर्डी- निर्मल, रा. मा. 160 अहमदनगर ते कोपरगाव आणि रा. म. मा. क्र. 561/ए अहमदनगर ते करमाळा टेंभुर्णी या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी मागील आठवड्यात आ. निलेश लंके यांनी राष्ट्रवादींच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या सहीनिशी निवेदन देत रस्ता दुरुस्तीबाबत कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
या इशार्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पत्रव्यवहार करत रस्त्या दुरुस्तीबाबत आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनानंतरही आ. निलेश लंके यांचे समाधान झाले नसून त्यांनी जिल्हाधिकारी यांना स्मरणपत्र पाठवून दि. 7 रोजी करण्यात येणार्या उपोषणास जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.
मागील अनेक दिवसापासून आ. निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे. याचाच भाग म्हणुन आ. निलेश लंके यांनी अहमदनगर दक्षिणमधील संपर्क वाढवला असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील सध्या प्रमुख समस्या ही रस्त्याची दुरावस्था बनली आहे. जिल्ह्यातून जाणार्या महामार्ग व राज्य मार्गाची दुरावस्था झाली असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी विविध आंदोलने करुन लढा दिला. एवढेच नव्हे तर न्यायालयात याचिकाही दाखल केली. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेबाबत प्रशासन ढिम्मच असल्याचे दिसून आले.
या रस्त्यांचे रखडलेले काम पूर्णत्वास जावे, यासाठी मागील आठवड्यात आ. निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास दि. 7 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला होता.
यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने रस्ता दुरुस्तीबाबत लेखी आश्वासन दिले. मात्र आ. लंके यांचे समाधान न झाल्याने त्यांनी आज पुन्हा जिल्हाधिकारी यांना स्मरणपत्र पाठवून उपोषणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासच्या परिसरात जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.
या स्मरणपत्रावर आ. निलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, राजेंद्र दौंड, किसन आव्हाड, रफिक शेख, नंदकुमार मुंढे, चाँद मणियार, हरिदास जाधव, बंडू पाटील बोरुडे, अनिल ढाकणे यांच्या सह्या आहेत.
राष्ट्रीय महमार्गाच्या दुरावस्थेवरून आ. निलेश लंके हे उपोषणावर ठाम असल्याचे दिसत आहे. यामुळे आगामी राजकारणात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. दुरावस्था झालेल्या रस्त्यावरूनच आ. लंके लोकसभेचा मार्ग सुकर करतील अशी चिन्हे सध्या दिसू लागली आहेत.
Comments