शेवगाव शहरातील अनाधिकृत फ्लेक्स रात्रीतून काढले
शेवगाव । वीरभूमी - 14-Dec, 2022, 10:01 AM
शेवगाव शहरातील चौकाचौकात अनाधिकृतपणे लावण्यात आलेले फ्लेक्स पोलिस प्रशासनाने रात्रीतून हटविले. यामुळे शहरातील चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे. फ्लेक्समुळे शहराचे होणारे विद्रुपिकरण थांबले असून यापुढेही अनाधिकृत फ्लेक्स बाबत पोलिस प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
मागील काही दिवसापासून शेवगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांती चौक, खरेदी विक्री संघ इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, संत गाडगेबाबा चौक, मिरी रोड, नेवासा रोड, लोकनेते गोपीनाथ मुंडे चौक आदीसह विविध चौकात फ्लेक्स बोर्डने दाटी केली होती. फ्लेक्स लावण्याच्या चढावढीत शहराचे विद्रुपिकरण झाले होते.
त्यातच सध्या शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींची निवडणूक सुरु आहे. यामुळे अचारंहितेचा भंग होवू नये म्हणुन शहरातील अनाधिकृत फ्लेक्स काढून घेण्याबाबत पोलिस प्रशासनाने आवाहन केले होते. यानंतर अनेकांनी आपले फ्लेक्स काढून घेतले तर काही फ्लेक्स पोलिस प्रशासनाने काढून घेतले.
विशेष म्हणजे शेवगाव शहरात लावण्यात आलेले फ्लेक्स पैकी अनाधिकृत फ्लेक्सची संख्या मोठी होती. यामुळे शेवगाव नगरपालिकेचा महसूल बुडत आला आहे. विशेष म्हणजे या अनाधिकृत फ्लेक्सबाबत नगरपालिकाही ठोस भूमिका घेत नसल्याने दिवसेंदिवस अनाधिकृत फ्लेक्सची संख्या वाढत आहे.
अनाधिकृत फ्लेक्सबाबत पोलिस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांनी ठोस भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अनाधिकृत फ्लेक्स लावणार्याबाबत दंडासह कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.
शहरात फ्लेक्स लावण्यासाठी संबधित नगरपालिकेची परवानगीची गरज असते. मात्र शेवगाव शहरात फ्लेक्स लावतांना कोणतीही परवानगी घेतली जात नाही. तसेच एकदा लागलेला फलक महिनोना महिने त्याच ठिकाणी लटकत असतो. त्याच ठिकाणी दुसारा फ्लेक्स लावला जातो. फ्लेक्स लावण्याचे हे चक्र सुरुच असते. शहरातील अनाधिकृत फ्लेक्सवर कोणतीही कारवाई न करत नगरपालिका मूक संमतीच देत असल्याने अनाधिकृत फ्लेक्स संख्या वाढून नगरपालिकेचा महसूलही बुडत आहे.
पोलिस प्रशासनाकडून आचारसंहितेमुळे काढण्यात आलेल्या फ्लेक्समध्ये काही फ्लेक्स एका गुन्ह्यातील आरोपीचेही लावण्यात आले होते. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
Comments