शेवगाव पोलिसांची कामगिरी । 40 टन तांदूळासह 53 लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात
शेवगाव । वीरभूमी - 24-Dec, 2022, 10:51 PM
खुल्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला. हा तांदूळ एका ट्रकमधून नेला जात होता. तर काही तांदूळ एका घरामध्ये साठवणूक करुन ठेवलेला होता.
शेवगाव पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री केली. यामध्ये तब्बल 40 टन तांदुळासह एकुण 53 लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव शहरातून नेवासा रोडने एका ट्रक मधून रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती गुप्त खबर्या मार्फत शेवगावचे पोनि. विलास पुजारी यांना समजली. या माहितीची खातरजमा करुन सपोनि. रविंद्र बागुल, सपोनि. विश्वास पावरा, सपोनि. शेळके यांच्यासह पोहेका. बाबासाहेब शेळके, पोना. प्रवीण बागुल, सोमनाथ घुगे, अशोक लिपणे, संतोष काकडे, पोकॉ. अमोल ढाळे, महिला पोलिस शितल गुंजाळ यांच्या पथकाने शेवगाव - नेवासा रोडवरून रेशनचा तांदूळ घेऊन जाणारा ट्रक (क्र. एमएच 16, सीडी 7180) पकडला.
ट्रकमध्ये रेशनचा तांदूळ असल्याने शासकीय पंचाना बोलावून पंचनामा करुन सदरचा ट्रक पोलिस ठाण्यात आणला. दरम्यान ट्रक चालकाकडे अधिक चौकशी केली असता रेणुकानगर येथील भिमा मारुती गायकवाड याचे घरात स्वस्त धान्य दुकानाचा शासकिय तांदुळ साठा करुन ठेवलेला होता, असे सांगितले. यावरुन पोलिसांनी सदरील ठिकाणी छापा टाकला असता दोन खोल्यामध्ये स्वस्त धान्याचा शासकीय तांदुळाचा साठा मिळून आला.
तेथे पोलिस गार्डची नेमणूक करुन नायब तहसीलदार राहुल पोपट गुरव व पुरवठा अधिकारी श्री. चव्हाण यांनी तांदूळाचे मोजमाप करुन पंचनामा केला. यामध्ये अंदाजे 9 लाख रुपये किंमतीचा 40 टन रेशनचा तांदूळ, 44 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा तब्बल 53 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
स्वस्त धान्य शासकीय तांदुळाची चोरटी वाहतूक करुन चढ्या भावाने बाजारात विक्री करण्यासाठी इतर जिल्ह्यात व आंतर राज्यात सदरचा तांदूळ विक्री होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. यामध्ये कोणकोणते व्यापारी, दुकानदार व व्यावसायिक सहभागी होते, याबाबत पोलिस माहिती घेत आहेत.
cWTaCtMVdkjnrHN