ग्रामपंचायत निवडणुकीनंतरचे चित्र । एकनिष्ठेमुळे माजी आ. राहुल जगतापच विधानसभेचे प्रबळ दावेदार
विजय उंडे । वीरभूमी- 25-Dec, 2022, 11:51 PM
श्रीगोंदा : नुकत्याच झालेल्या दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस व माजी आमदार राहुल जगताप यांना मानणार्या कार्यकर्त्यांच्या ग्रामपंचायती जास्त प्रमाणात निवडून आल्या. त्या पाठोपाठ आ. बबनराव पाचपुते यांना मानणारे निवडून आले आहेत. घोगरगाव ग्रामपंचायतीत बाबासाहेब भोस यांच्या गटाची निर्विवाद सत्ता आली.
घोगरगावच्या आसपासच्या गावांमध्ये काही जागा बाबासाहेब भोस यांना मानणार्या तर काही जागा आ. अरुण जगताप यांना मानणार्या निवडून आल्या आहेत. पारगाव सुद्रिक ग्रामपंचायतमध्ये राहुल जगताप यांचा वरचष्मा राहिला आहे.
बेलवंडी ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. किंबहुना त्यांचे पुत्र ऋषिकेश जिल्ह्यात विक्रमी मतांनी विजयी झाले. अण्णासाहेब शेलार सध्या राहुल जगताप यांचे नेतृत्व मानत आहेत. उरलीसुरली माठ ग्रामपंचायत राहुल जगताप यांच्याच ताब्यात गेल्याने त्यांच्या नेतृत्वाचा करिष्मा ग्रामपंचायत निवडणुकीत उजळून निघाला आहे.
काष्टी ग्रामपंचायतीचा निकाल ऐतिहासिक ठरला. स्व. सदाशिव पाचपुते यांचे चिरंजीव साजन पाचपुते यांचे नवनेतृत्व त्याठिकाणी निर्माण झाले आहे. भविष्यात श्रीगोंदा तालुक्याच्या राजकरणात नव्याने ते नेतृत्व म्हणून पुढे आले आहे. भविष्याच्या राजकारणात ते विधानसभेला उमेदवार म्हणून पुढे येतील की नाही याचे उत्तर काळच ठरवणार आहे. श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात बाबासाहेब भोस यांना मानणारा वर्ग तालुकाभर पसरला आहे. त्यांच्या नेतृत्वाची चुणूक या निवडणुकीच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवली आहे.
विधानसभा निवडणुकीत श्री. भोस यांची भूमिका निर्णायक ठरणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. श्रीगोंदा तालुक्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असूनही माजी आमदार राहुल जगताप यांनी शरद पवारांना मानणार्या जनमताच्या रेट्यामुळे राष्ट्रवादीत राहणे पसंत केले आहे.
महाराष्ट्र राज्य साखर संघावर संचालक म्हणून त्यांची निवड करताना पवार कुटुंबीयांनी त्यांना उमेदवारीचा हिरवा कंदिल दाखवला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचे नेतृत्व उजळल्याने विधानसभेला ते आरपारची लढाई करणार याबाबत आता शंका उरल्या नाहीत.
नागवडे काँग्रेस व्हाया शिंदे गट ते भाजपा असा प्रवास करणार? राजेंद्र नागवडे यांनी सपत्नीक नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. श्रीगोंदा नगरपालिका शिंदे गटाच्या ताब्यात देण्यासाठी जोरदार व्युव्हरचना आखली. मात्र माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे व नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी त्यांना न्यायालयीन जाळ्यात अडकवले. तारीख पे तारीख करत श्री. पोटे यांनी वेळकाढूपणा घेण्याचा निर्णय घेतला. काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत आ. बबनराव पाचपुते व त्यांच्या कुटुंबीयांना नागवडे यांनी डिवचल्याने श्रीगोंदा नगरपालिकेच्या राजकारणात बबनराव पाचपुते नागवडे विरोधी भूमिका घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेले राजेंद्र नागवडे यांचा त्याठिकाणी टिकाव न लागल्यास ते भाजपाचे दार ठोठावतील असे राजकीय भाकीत बोलले जात आहे.
HwSJFIZncrboql