डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी गुरुवारी आक्रोश मोर्चा
अकोल्यातील अतिक्रमित जागेचा वाद । जिल्हाभरातून हजारो आंदोलक सहभागी होणार
अकोले । वीरभूमी- 04-Jan, 2023, 03:42 PM
अकोले शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे, या मागणीसाठी गुरुवार दि. 5 जानेवारी रोजी भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात पक्ष व राजकारण बाजूला ठेवून सर्व समाज या मोर्चासाठी एकवटला असून भव्यदिव्य मोर्चा होणार असल्याचे आरपीआयचे नेते तथा राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाच्या मागणीसाठी होणार्या या आक्रोश मोर्चाची माहिती देण्यासाठी अकोले येथे मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अरुण रुपवते, रमेश जगताप, राजेंद्र गवांदे, रमेश शिरकांडे, सुरेश देठे, विजयराव वाकचौरे, रमेशराव जगताप, राजेंद्र गवांदे, अरुण रुपवते, लक्ष्मण आव्हाड, सुरेश देठे, प्रा. प्रकाश जगताप, संतोष देठे, वसंत उघडे, सूर्यकांत जगताप, शिरकांडे रमेश, गौतम रोकडे, राजू रुपवते, प्रवीण देठे, मिलिंद रुपवते, सागर शिंदे, भाऊसाहेब साळवे आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत विजयराव वाकचौरे म्हणाले की, अकोले शहरातून जाणार्या कोल्हार - घोटी मार्गालगत महात्मा फुले चौकाच्या शेजारी 50 वर्षापासुन बौद्ध समाजाची स्मशानभुमी आहे. ही जागा 30 गुंठे असून त्यावर अतिक्रमण झाल्याने ती दुर्लक्षित राहिली आहे. याबाबत मोठा लढा दिल्यानंतर त्याला आता यश आले आहे. या जागेवर आता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे, ही जागा प्रशासनाने स्मारकासाठी द्यावी, यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे.
या मोर्चासाठी जिल्हाभरातून प्रत्येक तालुक्यातील हजारो नागरिक सहभागी होणार आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावातून महिला व पुरुष यात सहभागी होणार आहे. गुरुवार दि. 5 जानेवारी 2023 रोजी काढण्यात येणार्या मोर्चात जिल्हा व राज्य भरातून हजारो भीम सैनिक शांततेच्या मार्गाने मोर्चात सहभागी होणार आहेत. यासर्व घटकांचा पाठिंबा घेत या मोर्चात 10 ते 15 हजार नागरिक सहभागी होतील, असा अंदाज असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.
अकोले तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झालेला आहे. या भूमीत त्यांच्या विचारांचे भव्यदिव्य स्मारक असावे अशी जनतेची अपेक्षा आहे. तरुणांना, समाजाला प्रेरणा देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य दिव्य स्मारक असावे. या ठिकाणी चांगले वाचनालय व्हावे, अशा दृष्टिकोनातून स्मारक समितीने या ठिकाणी आदर्श असे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
हा आक्रोश मोर्चा कोणाच्याही विरोधात किंवा कोणाला टार्गेट करण्यासाठी नसून महापुरुषांचे विचार आणि प्रेरणांच्या स्मृती जपण्यासाठी असल्याचे विजयराव वाकचौरे यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी 11 वाजता मोर्चा हा पोलीस ग्राऊंड ते महात्मा फुले चौक असा जाणार असून मोर्चाने जाऊन स्मारक समितीचे आंदोलक जागेचा ताबा घेणार आहेत, असे वाकचौरे यांनी सांगितले.
यावेळी रमेशराव जगताप व अरुण रुपवते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी अरुण रुपवते म्हणाले की, ही जागा पूर्वी स्मशानभूमी म्हणून वापरली जात असे. नंतरच्या काळात तिचा स्मशानभूमी म्हणून वापर कमी झाला. ही जागा ताब्यात मिळावी यासाठी न्यायालयीन लढाई झाली. नंतर तडजोड झाली व जागेवरील अतिक्रमण काढण्यास सहकार्य सूरु झाले आहे.
या जागेसमोर असलेल्या टपरी धारकांशी चर्चा करून त्यांना पर्यायी व्यवस्था कशी करता येईल, यावर विचार करण्यात येईल असे सांगितले.
ही जागा अतिक्रमित झाली हाती. मात्र सॉ मिल मालक, प्रशासन आणि आंदोलक यांनी प्रश्न चिघळणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे जागेचा प्रश्न व वाद मिटला असून ही जागा प्रशासनाने स्मारकासाठी द्यावी, अशी मागणी यावेळी रमेशराव जगताप यांनी केली.
Comments