राष्ट्रवादी पदाधिकार्यांकडून पिचड, वाकचौरे यांचा सत्कार
अकोले तालुक्यात उलटसुलट चर्चा । अमृतसागर दूध संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड
अकोले । वीरभूमी- 21-Jan, 2023, 12:59 PM
अकोले तालुक्यातील अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी माजी आ. वैभवराव पिचड यांची तर उपाध्यक्षपदी रावसाहेब वाकचौरे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्यांनी सत्कार केल्याने तालुक्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा होत आहे.
माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने अमृतसागर दूधसंघावर एकतर्फी विजय संपादन केला. या निवडणुकीत महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या शेतकरी समृद्धी मंडळाचा दणदणीत पराभव केला. या मंडळाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. तर शेतकरी विकास मंडळाने 13 जागांवर नेत्रदीपक यश संपादन केले होते.
अमृतसागर दूध संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडी करिता निवडणूक पार पडली. अध्यासी अधिकारी म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पराय यांनी काम पाहिले. यावेळी अध्यक्षपदासाठी माजी आ. वैभवराव पिचड तर उपाध्यक्षपदासाठी रावसाहेब वाकचौरे यांचे एकमेव अर्ज आल्याने दोघांचीही निवड बिनविरोध पार पडली.
अध्यक्षपदासाठी वैभवराव पिचड यांच्या नावाची सूचना ज्येष्ठ संचालक आनंदराव वाकचौरे यांनी मांडली त्यास अरुण गायकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी रावसाहेब वाकचौरे यांचे नावाची सूचना रामदास आंबरे यांनी मांडली त्यास आप्पासाहेब आवारी यांनी अनुमोदन दिले.
यावेळी संचालक शरदराव चौधरी, गोरख मालुंजकर,जगन देशमुख, बाबुराव बेणके, बबनराव चौधरी, गंगाधर नाईकवाडी, सुभाष डोंगरे, अरुण गायकर, सौ.सुलोचना औटी, सौ.अश्विनी धुमाळ असे सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, अकोले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इंजि.सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख आदींनी मनोगते व्यक्त केली.
पुढील येऊ घातलेली जि. प. व पं. समिती निवडणूक सर्वानी एकजीवाने लढवावी, असे सांगत मा.आ.वैभवराव पिचड यांनी राज्यातून तालुक्यासाठी मोठा निधी आणला असून अजून विकासकामांसाठी प्रस्ताव पालकमंत्री ना.विखे पाटील यांचेकडे पाठविले आहे, असे सांगितले. तसेच अगस्ति साखर कारखान्याच्या कर्जा संदर्भात टिका करण्यात आली.
निवडीनंतर भाजपच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकारी यांच्या वतीने अमृतसागर दूध संघ कार्यालय परिसरात नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांचा श्रद्धांजली ठराव अ.ता.एज्यु सोसायटी चे अध्यक्ष इंजि सुनिल दातीर यांनी मांडला. यावेळी स्वर्गीय भांगरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन मा. आ वैभवराव पिचड म्हणाले की, दूध उत्पादकांनी शेतकरी विकास मंडळावर मोठा विश्वास दर्शविला. दूध संघाच्या माध्यमातून मागील 7 वर्षात इतर दूध संघाच्या तूलनेत सर्वाधिक रिबेट दिले. अनेक अडचणींवर मात करीत दूध संघावर कर्जाचा बोजा न करता दूध संघ नफ्यात आणला. उत्पादकांनी पारदर्शी कारभाराला साथ दिली.
यापुढील काळात दूध संघाचे नाव राज्यभर होईल, त्यासाठी प्रयत्न करू व दूध उत्पादकांचा विश्वास कायम ठेऊ अशी ग्वाही देत पुन्हा एकदा आम्हाला संधी दिली त्याबद्दल दूध उत्पादकांचे आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष बबन वाळुंज, भाऊसाहेब साळवे आदीसह अनेक पदाधिकारी यांनी नूतन चेअरमन वैभवराव पिचड व व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे यांचा सत्कार केला.
वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली मागील पाच-सात वर्षात दूध उत्पादक शेतकरी हिताचे चांगले निर्णय घेतले. म्हणून त्यांना पुन्हा संधी मतदारांनी दिली. पुढेही असेच चांगले काम करावे, अशी अपेक्षा राजेंद्र कुमकर यांनी व्यक्त केली. तसेच हा सत्कार आम्ही शेतकरी या नात्याने केला आहे.
आम्ही आमच्या राष्ट्रवादी मध्येच आहोत असेही सांगण्यास ते विसरले नाहीत. परंतू त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्या पदाचे राजीनामे दिलेले असल्याने व त्यांनी वैभवराव पिचड यांचा सत्कार केल्याने तालुक्यात काही राजकीय भूकंप होतो की, काय याबाबत नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे. अर्थात सोमवारी किंवा मंगळवारी राजीनाम्याबाबत पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.
fACOqSdMp