सत्यजित तांबेंच्या उमेदवारीचा खल पडद्याआडून
बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्याचे षडयंत्र । थोरातांना खिंडीत पकडण्यासाठी चव्हाण, पटोलेंनी कंबर कसली
विजय उंडे । वीरभूमी- 29-Jan, 2023, 07:20 AM
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवर काँगेसच्या इतिहासात रावसाहेब पटवर्धन, शरद पवार व बाळासाहेब थोरात या तिघांचीच आजपर्यंत महाराष्ट्रातून निवड झाली आहे. बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या या कमिटीत सन्माननीय सदस्य आहेत. त्यामुळे सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या गळ्यातील ताईत ते बनले आहेत. हिच बाब माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना खुपत असल्याने प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना हाताशी धरून त्यांनी थोरात विरोधी आघाडी उघडली आहे. याचे थेट कनेक्शन प्रवरेशी असल्याचे बोलले जात आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांनाही संधी मिळाली नव्हती. मात्र बाळासाहेब थोरातांवर गांधी कुटुंबाने विश्वास टाकून ही संधी त्यांना रावसाहेब पटवर्धन व शरदराव पवार यांच्यानंतर मिळवून दिली. बाळासाहेब थोरात यांच्यावर पक्ष श्रेष्ठींनी जो विश्वास टाकला तो सध्यातरी महाराष्ट्रात अजोड असा आहे.
महाराष्ट्रातून बाळासाहेब थोरात हे एकमेव काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकत होते. मात्र तसे न करता त्यांनी सध्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांची विश्वासाहर्ता पक्ष श्रेष्ठींजवळ आणखीच वाढीला लागली. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रभर पडझड चालू असताना बाळासाहेब थोरातांनी राज्यभर प्रचारसभा घेतल्या.
महाराष्ट्रभर काँग्रेसजण व नेतेगण भयभीत झाले असताना बाळासाहेब थोरात त्यांना आधार देत फिरत होते. त्यावेळी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद भूषविलेले अशोक चव्हाण व सध्याचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आपला मतदारसंघ सोडायला तयार नव्हते. विधानसभा निवडणुक झाल्यानंतर महाविकास आघाडीची निर्मिती होऊ शकते याची पहिली चर्चा शरदराव पवार व बाळासाहेब थोरात यांच्यात पाहिली बैठक बारामती येथे झाली.
शिवसेनेबरोबर काँग्रेसचे सुत जुळवण्यात श्री. थोरातांनी पक्ष श्रेष्ठींकडे यशस्वी शिष्टाई केली. बाळासाहेब थोरातांमुळेच काँग्रेस नेत्यांना अडीच वर्षे सत्तेचा लाभ भोगता आला. त्याच बाळासाहेब थोरातांविरोधात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व नानाभाऊ पटोले काही स्थानिक पदाधिकार्यांना हाताशी धरून बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात कारवाया करत आहेत. माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण व कै. बाळासाहेब विखे पाटील यांची राजकीय मैत्री महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. या दोन्ही नेत्यांची मैत्री पुढच्या पिढीतही कायम राहिली.
मध्यंतरी अशोक चव्हाण काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा प्रसार माध्यमांमधून दाखवल्या गेल्या. राधाकृष्ण विखे यांच्या मार्फत भाजपाशी ते जवळीक करत असल्याचेही बोलले जात होते. त्याच अशोकराव चव्हाण यांचा काँग्रेस पक्षाबद्दल पदवीधर निवडणुकीपासुन प्रचंड उमाळा वाढला आहे. थोरात घराण्याचे कायम विरोधक असलेले विखे कुटुंबाची किनार या संपुर्ण वादाला असल्याचे लपून राहिलेले नाही.
मुळात नाशिक पदवीधर मतदारसंघ हा डॉ. सुधीर तांबे यांनी त्यांच्या एक छत्राखाली कधीच करून टाकला होता. ते काँग्रेसमध्ये होते म्हणून त्या मतदारसंघावर काँग्रसचे प्राबल्य वाटत होते. डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसची उमेदवारी न करता त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांना अपक्ष म्हणून निवडणूकीत उतरवले. या उमेदवारीचा बागलबुवा करणार्या अशोकराव चव्हाण व नानाभाऊ पटोले यांच्याहाती काहीच लागणार नसल्याचे दि. 30 जानेवारी नंतर दिसून येईल.
फडणवीस यांची धोबीपछाड.. काँग्रेसला की विखेंना?
विखे कुटुंबीय ज्या पक्षात जातात तेथे सवतासुभा तयार करतात असा इतिहास सांगतो. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना प्रवरानगर येथे सहकार परिषदेच्या निमित्ताने आणून त्यांना राधाकृष्ण विखे यांनी आकर्षित केले. सुजय विखे खासदार असल्याने दिल्लीत जुळवाजुळव करण्यासाठी त्यांना दुसर्याची मदत घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे भाजपात कमी कालावधीत त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले. भाजपा मंत्र्यांमधील सर्वाधिक ताकदीचे खाते त्यांच्याकडे आहे. भविष्यात मराठा चेहरा म्हणून राधाकृष्ण विखे भाजपातून मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे संकेत मिळत असताना सत्यजित तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून भाजपचा उमेदवार न देता सत्यजित तांबे यांना अप्रत्यक्ष ताकद देणार्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे विरोधी खेळलेली ही चाल असल्याचे बोलले जात आहे.
qcxyXOtZnQEpoaDI