शेवगाव पोलिस ठाण्यातील प्रकार । अपघातातील वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मागीतली लाच
शेवगाव । वीरभूमी - 01-Feb, 2023, 02:53 PM
चारचाकी वाहानाच्या धडकेत मृत पावलेल्या वडीलांना न्याय मिळावा, यासाठी सदरील आरोपी वाहन चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी 20 हजारांची लाच मागणार्या शेवगाव ठाण्यातील पोलिस कर्मचार्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कर्मचार्याचे नाव संतोष चंद्रकांत काकडे (वय 36, पद- पोलिस नाईक, शेवगाव पोलिस ठाणे) असे आहे.
शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत तक्रारदार यांच्या वडीलांचा अपघात होवून मृत्यू झाला आहे. या अपघातातील आरोपी वाहन चालकाचा शोध घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस नाईक संतोष चंद्रकांत काकडे (वय 36) याने तक्रारदार यांचेकडे दि. 13 जानेवारी 2023 रोजी 20 हजार रुपयाची लाच मागीतली.
पोलिस कर्मचार्याकडून लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदार यांनी याबाबतची माहिती नाशिक येथील लाचलुचपतच्या पथकाला दिली. या तक्रारीनंतर सापळा अधिकारी पोलिस निरिक्षक साधना इंगळे यांनी कारवाई करत शेवगाव पोलिस ठाण्यात पोना. संतोष चंद्रकांत काकडे याच्याविरुद्ध लाच मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई लाचलुचपतच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोनि. साधना इंगळे, पो. हवा. सचिन गोसावी, पो. हवा. प्रफुल्ल माळी, पो. हवा. चंद्रशेखर मोरे, पो. ना. मनोज पाटील, चा. पो. हवा. विनोद पवार यांच्या पथकाने केली.
मागील अनेक दिवसापासून शेवगाव पोलिस ठाणे लाचलुचपतच्या निशान्यावर होते. मात्र अखेर पोलिस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला.
शेवगाव तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात जनतेची कामे करण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. पैसे दिले नाही तर काम केले जात नाही. असे होत असल्याच लाचलुचपत विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.
Comments