अभिनेते शंतनू मोघे । अभिनव शिक्षण संस्थेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन
अकोले । वीरभूमी- 04-Feb, 2023, 05:10 PM
हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असताना त्यांचे विचार अंतर्भूत केले. पालकांनी मुलांना जे जे आवडते त्यास प्रोत्साहन द्यावे. मला इंजीनियरिंग करत असतानाच अभिनय करण्याची संधी मिळाली आणि जगण्याचा सूर सापडला. कला ही प्रत्येकाच्या अंगी असते. मुलांनी अभ्यासासोबत कलागुण जोपासावेत. ते विकसित करण्याची संधी अभिनव शिक्षण संस्था देते, असे प्रतिपादन स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेले अभिनेते शंतनु मोघे यांनी केले.
अभिनव शिक्षण संस्थेमधील वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक मधुकरराव नवले हे होते. यावेळी पत्रकार प्रमोद कुंभकर्ण, अर्चना कुंभकर्ण, साईप्रसाद कुंभकर्ण, सुमनताई नवले, विक्रम नवले, भागवत नवले, अरुण नवले, मीनानाथ पांडे, ह. भ. प. विवेक महाराज केदार, ल. का. नवले, मंदाताई नवले, रमेश जगताप, अॅड. आनंदराव नवले तसेच सर्व विभागाचे प्राचार्य, विभागप्रमुख उपस्थित होते.
सुरुवातीला अभिनेते शंतनू मोघे यांची अकोले शहरातून मोटरसायकल रॅली समवेत भव्य मिरवणूक काढण्यात आली. रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे या रॅलीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. अभिनव संकुलात अभिनेते शंतनु मोघे यांचे लेझिम पथकाने उत्तम सादरीकरण करत स्वागत केले. मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून शिव आरती केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एमबीए महाविद्यालयाचे विभाग प्रमुख अनिल बेंद्रे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संस्थेचे संस्थापक मधुकरराव नवले यांनी आपल्या प्रास्ताविकांमध्ये ऐतिहासिक आणि पौराणिक पाऊल खुणा असलेला, अनेक बंड आणि चळवळीचा इतिहास असलेला अकोला तालुका आहे. अनेक गुणी रत्न असलेली भूमी अकोले तालुक्याची आहे. असे नमूद करत कोणत्याही क्षेत्रात अभिनवचे विद्यार्थी मागे नाहीत आणि हीच अभिनवची यशोगाथा असल्याचे मत व्यक्त केले.
अभिनेते सुशांत मोघे यांच्या अभिनयाचा गौरव करून सर्वांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी विविध क्षेत्रात राज्य पातळीवर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते पारितोषिक देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत मंडलिक आणि प्राजक्ता सोलापुरे यांनी केले.
ycHYxTLNJeqfPh