नवनिर्वाचित आ. सत्यजित तांबे यांचा नाशिकमध्ये गौप्यस्फोट
नाशिक । वीरभूमी- 04-Feb, 2023, 05:44 PM
नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर प्रदेश कार्यालयाकडून मला नागपपूर व औरंगाबादचे कोरे एबी फॉर्म देण्यात आले. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही, चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता, असा आरोप नवनिर्वाजित आ. सत्यजित तांबे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेवून केला.
निवडणूक काळात माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला. मात्र चुकीचा एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी खुलासा का केला नाही? असा सवाल आ. तांबे यांनी यावेळी करत ‘मी अपक्ष अर्ज भरला होता. अपक्ष निवडून आल्यामुळे यापुढे अपक्ष म्हणुनच राहणार असल्याची आपली भूमिका स्पष्ट केली.
आ. सत्यजित तांबे पुढे म्हणाले, मला संधी मिळू नये, युवकांना संधी मिळू नये म्हणून वरच्या स्तरावर प्रयत्न करण्यात आले. माझ्या वडिलांना शो कॉज नोटिस न देता एक मिनिटात निलंबित करण्यात आलं. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचं काम काही नेत्यांकडून केलं जात आहे. असा आरोपही सत्यजित तांबे यांनी केला. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी फॉर्म भरतांना मला नागपूर व औरंगाबाद विभागाचे कोरे एबी फॉर्म दिले. हे फॉर्म चुकीचे आल्याचेही मी पक्षाला कळवले होते. जर मला अपक्ष फॉर्म भरायचा असता तर मी प्रदेश कार्यालयाला चुकीचा एबी फॉर्म आल्याचं कळवलं नसतं असं आ. सत्यजित तांबे म्हणाले.
पुढे बोलताना आ. तांबे म्हणाले की, मला चुकीचा एबी फॉर्म देण्यात आला. त्यावर काहीही खुलासा करण्यात आला नाही. पण पक्षाचा अंतर्गत प्रश्न असून तो आतच मिटवावा अशी भूमिका मी घेतल्यानंतर, मला पक्षाचा पाठिंबा हवा असेल तर त्यासाठी एक पत्र लिहायला लावलं. त्यानंतर मला त्यातून माफी मागायला सांगितली. मी पक्षामध्ये अनेक वर्षे काम केलं, त्यामुळे मी माफीही मागायला तयार झालो.
पण एकीकडे मला माफी मागायला लावली आणि दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. मी दिल्लीशी संपर्क केला, तरीही मला पक्षाने पाठिंबा दिला नाही, अशी धक्कादायक माहिती पत्रकार परिषदेत आ. सत्यजित तांबे यांनी दिली आहे. आम्ही पथ्य पाळले आहे.. पक्षातील गोष्टी बाहेर मांडायच्या नाही.. पण सतत आरोप झाले. फसवलं, धोका दिला. मला पक्षासमोर बाजू मांडायची संधी दिली नाही. सतत माझ्या विरोधात बोलले गेले, म्हणून मी आज माझी बाजू मांडली आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे राजकारण दाबावे. यासाठी द्वेषपूर्ण पद्धतीने गोष्टी घडल्या. मी माफी मागण्याची तयारी दाखवली तर पक्षातील नेते दुसरा उमेदवार घेऊन फिरत होते. सगळ्यात आधी शरद पवार यांनी भूमिका घेत, हा पक्ष अंतर्गत विषय आहे. तो प्रश्न समोपचाराने मिटवावा. याबद्दल मी शरद पवार यांचे आभार मानतो, असे आ. सत्यजित तांबे यांनी सांगितले.
चांगले