अहमदनगर । वीरभूमी - 05-Feb, 2023, 04:27 PM
काल झालेल्या चिचोंडी येथील कार्यक्रमात मला अडीच वर्षाचा हिशोब मागितला. मात्र माझ्या कामाचा हिशोब द्यायचे झाले तर तो तुम्हाला लिहिताही येणार नाही, अशी टीका माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांचे नाव न घेतला केली.
तिसगाव व 33 गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आ. तनपुरे बोलत होते. यावेळी माजी आ. चंद्रशेखर घुले, आ. निलेश लंके, अॅड. प्रताप ढाकणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवशंकर राजळे, क्षितीज घुले यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री आ. तनपुरे म्हणाले, सन 2014 व सन 2019 च्या निवडणुकी दरम्यान राहुरीचे लोक पाणी येवू देणार नाही नाही, असा प्रचार काही लोकांनी केला. त्यांना मी सांगू इच्छितो की, मिरी-तिसगाव भागात पाण्याचे दुर्भिक्ष होते. यामुळे माझे विधानसभेतील पहिले भाषण मिरी-तिसगाव पाणी योजनेवर झाले. त्यानंतर या भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
सुरुवातीला मुळा धरणावरुन तिसगावसाठी पाणीयोजना आणण्याचा निर्णय झाला. मात्र यामध्ये ज्या गावांनी मागणी केली ती गावे यामध्ये समाविष्ट करुन तिसगाव व 33 गावे ही 155 कोटीची योजना मंजूर करुन घेतली. दहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात काहीच केलेले नाही, अशा लोकांना भिती सुटली आणि त्यांनी आपल्या कार्यक्रमाच्या अगोदर चिचोंडी येथे कार्यक्रम उरकून घेतला.
चिचोंडी येथील कार्यक्रमात मला अडीच वर्षाचा हिशोब मागितला. मात्र माजी आमदारांना माझे सांगणे आहे, ज्या वांबोरी चारीच्या पाण्याच्या हिशोबापासून सुरुवात करु. ज्या वांबोरी चारीचे तुम्ही फक्त बटणे दाबायचे आणि पुढे पाणी यायचे नाही. तुम्ही 10 वर्षात जेवढे पाणी दिले त्याच्या तीनपट या तीन वर्षात पाणी देण्याचे काम केले. 155 कोटींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेत मी जर लक्ष दिले नसते तर ही योजना 50-60 कोटीत झाली असती.
पिण्याच्या पाण्याचा हिशोब, शेतीच्या पाण्याचा हिशोब आणि आणखी आमची मंजुर केलेली कामे पुढे व्हायची आहेत. आमचा हिशोब द्यायचा झाले तर तो तुम्हाला लिहिताही येणार नाही. गेल्या तीन वर्षाच्या आपल्या सरकारच्या काळात पाथर्डी तालुक्याच्या या भागाकरिता शेतीचे पाणी, पिण्याचे पाणी हा विषय तुमचा आमदार म्हणुन प्रामाणिकपणे मार्गी लावण्याचे काम केले.
पाथर्डी तालुक्यातील गावांसह नगर व राहुरी तालुक्यातील गावांचा समावेश केला आहे. वर्षभरामध्ये जेंव्हा चांगल्या प्रकारे ही योजना पूर्ण होईल तेंव्हा अजितदादा तुम्हालाच मुख्यमंत्री म्हणुन या ठिकाणी उद्घाटनाला यावे लागेल ही आम्हा सर्वांची अपेक्षा आहे.
तिसगावकरांचे जे स्वप्न होते ते माझ्या आमदारकीच्या काळात पूर्ण करु शकलो. महिलां भगिणींचा वेळोवेळी पाण्यासाठीचा अट्टाहास आमदार म्हणुन पूर्ण केला. योजना पूर्ण झाल्यानंतर तुमच्या चेहर्यावर जे समाधान मिळेल त्यापेक्षा मोठे समाधान नसणार आहे.
fzSWQKyhLx