तालुक्यातील नेत्यांनी जागा त्यांच्याच बगलबच्चांना वाटून घेतल्याने मतदार खवळले । निकाल धक्कादायक लागणार?
विजय उंडे । वीरभूमी- 11-Feb, 2023, 07:02 PM
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुका छत्रपती शिवाजी महाराज खरेदी विक्री संघाची निवडणुक उद्या दि.12 रोजी होत असून त्या निवडणुकीतील निकाल धक्कादायक लागण्याची चिन्हे आहेत. कार्यकर्त्यांसाठी असलेल्या या निवडणुकीत खर्चाच्या अपव्यवामुळे तालुक्यातील नेत्यांनी एकत्रित येऊन ही निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. मात्र नेत्यांनी त्यांच्याच बगलबच्चांना तिकिटे देऊन कार्यकर्त्यांना वार्यावर सोडल्याने मतदार खवळले असल्याचे चित्र आहे.
श्रीगोंदा तालुका हा कार्यकर्त्यांचा विशेषतः चळवळीतील कार्यकर्त्यांचा तालुका म्हणून राज्यभर ओळख असलेला तालुका आहे. तालुक्यातील नेते त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना झुंजायला लावतात. मात्र कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या की, हात वर करतात. बाजार समिती, खरेदी-विक्री संघाच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. या निवडणुका बिनविरोध होण्यावर नेत्यांचा भर असतो.
आमदारकीच्या निवडणुकीत मात्र हेच नेते तालुक्यातील कार्यकर्त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी झुंजायला लावतात. नेत्यांच्या या स्वार्थी प्रवृत्तीमुळे खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत मतदारांचा मोठ्या प्रमाणात असंतोष वाढला आहे. याची परिणीती या निवडणुकीत दिसून येण्याची दाट शक्यता आहे. तालुक्यातील नेत्यांनी जागा वाटप करताना त्यांच्या पुढे पुढे करणार्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. त्यामुळे चळवळीतील कार्यकर्ते जाणीवपूर्वक बाजुला ठेवले गेले आहेत.
काही नेत्यांनी तर कोणत्याच कार्यकर्त्यावर विश्वास न ठेवता घरातील माणसांना उमेदवारी दिल्याने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पहायला मिळत आहे. तालुक्यातील नेत्यांच्या विरोधात धाडस करून ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती वाढल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा जसा सपाटा लावला आहे, तसाच तो विधानसभेच्या निवडणुकीतही नेत्यांनी एकत्रित येऊन आमदारकी बिनविरोध करावी व कार्यकर्त्यांमध्ये झुंजी लावण्याचे धंदे बंद करावेत, अशी प्रतिक्रिया एका जबाबदार कार्यकर्त्याने दै. वीरभूमीशी बोलताना व्यक्त केले. खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीतील नेत्यांचे पॅनल एकीकडे व सर्वसामान्य मतदार दुसरीकडे असे चित्र पहायला मिळत आहे.
खरेदी विक्री संघाचा निकाल धक्कादायक लागणार? श्रीगोंदा तालुक्यातील नेते मतदारांना गृहीत धरून राजकारण करतात. स्वतःच्या स्वार्थासाठी मतदारांना वापरून घेण्याच्या भूमिकेमुळे खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत मतदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या उमेदवारांबद्दल प्रचंड सहानुभूती तयार झाल्याचे चित्र आहे. नेत्यांच्या आदेशाचा काटा होण्याची या निवडणुकीत दाट शक्यता आहे.
Comments