पाथर्डी । वीरभूमी - 23-Feb, 2023, 12:34 AM
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धांस्थान असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथे राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो नाथभक्त, ग्रामस्थांच्या उपस्थितीत मढी येथील होळीचा (भट्टी) सण पारंपारिक पद्धतीने अत्यंत उत्साहात मंगळवारी रात्री संपन्न झाला. नगारा, शंख निनाद व कानिफनाथांच्या जयघोषात गडावर होळी पेटली. शेकडो वर्षाची परंपरा या भट्टीच्या सणाला असून पर्यावरण व निसर्ग वाचवण्याचा मोठा संदेश या सणानिमित्ताने दिला जातो.
मढी येथे होळी पासुन गुढी पाडव्यापर्यंत यात्रा भरते. 15 दिवस अगोदरच होळीचा सण साजरा करणारे मढी हे देशातील एकमेव गाव असुन पौर्णिमाच्या होळीचा मान गोपाळ समाजाला दिला जाऊन त्या दिवशी मढीचे ग्रामस्त होळी करत नाही. सकाळपासूनच गडावर नाथभक्तांची गर्दी तर घरोघरी पाहुण्यांची वर्दळ होती.
या सणासाठी लागणार्या गोवर्या दहा दिवस अगोदरच कानिफनाथांचे नाव घेत महिलांकडून तयार केल्या जातात. घरोघरी तयार केलेल्या गोवर्या वाजत गाजत गडावर आणण्यात आल्या. गावातील प्रत्येक घरातुन नाथांना व होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य ग्रामस्थांकड्डन ठेवण्यात आला.
मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड व पुजारी यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. यावेळी देवस्थानच्या सचिव विमलताई मरकड, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त रवींद्र आरोळे, डॉ.विलास मढीकर, शामराव मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, देविदास मरकड आदी उपस्थित होते.
स्थानिक भाविक याला भट्टीचा सण म्हणतात. याचे मुख्य कारण नाथांच्या गडाला रंगरंगोटी करण्यासाठी चुन्याची भट्टी यादिवशी लावली जायची व दुसरे प्रमुख कारण म्हणजे भट्टी पेटवणे असा उल्लेख करून होळी शब्द न वापरता पूर्वजांनी हजारो झाडांची कत्तल रोखण्याचा प्रयत्न केला. होळी सण साजरा करताना सर्व जाती-धर्माचे लोक अत्यंत श्रद्धा, निष्ठा व सामाजिक सलोख्याने आनंदोत्सव साजरा करतात.
येथील होळीत एक ही लाकूड वापरले जात नाही. शुद्ध तूप, कापूर, सुगंधी वनस्पती आदींच्या साहाय्याने होळी प्रज्वलित केली जाते. पूर्वी या परिसरात प्रचंड प्रमाणात झाडी होती. त्याची तोड होऊ नये, पर्यावरण रक्षण व्हावे, म्हणून झाडे तोडून होळी पेटवण्याऐवजी शेणाच्या गोवर्या थापुन त्याला धार्मिक महत्त्व देत होळीचा सन साजरा होतो. शेकडो वर्षानंतरही ही परंपरा कायम आहे.
rKzGHoVkYDyUvT