दुकान बंद करुन घरी जातांना घडली घटना
पाथर्डी । वीरभूमी - 23-Feb, 2023, 10:31 PM
पाथर्डी शहरातील नवी पेठेतील सोने-चांदीचे व्यापारी बंडूशेठ चिंतामणी नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी जात असतांना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात सराफा व्यापारी राजेंद्र उर्फ बंडूशेठ चिंतामणी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारासाठी नगर येथे पाठविले आहे.
ही घटना गुरुवारी रात्री 7.45 वाजेच्या दरम्यान पाथर्डी शहरातील नवीन बसस्थानक परिसरात घडली. या घटनेने शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारांवर कायद्याची जरब नसल्याचे समोर आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी शहरातील नवी पेठेत राजेंद्र उर्फ बंडूशेठ चिंतामणी यांचे सोने-चांदीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान दुकान बंद करुन ते आनंदनगर येथे घरी जात असतांना त्यांच्यावर अज्ञात चोरट्यांनी खुनी हल्ला केला. चिंतामणी यांच्यावर हल्ला करुन हल्लेखोर पसार झाले.
या हल्ल्यात चिंतामणी हे गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत पाथर्डी उपजिल्हा रुग्णांलयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले. हल्लेखोरांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावली असल्याचा संशय आहे.
यामुळे या घटनेमध्ये रोख रक्कम व सोन्या - चांदीचा किती ऐवज चोरीला गेला हे चिंतामणी यांच्या जबाबानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेने पाथर्डी शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने पाथर्डी शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरासह तालुक्यात अवैध धंदे, लुटमार, चोरी, दुचाकी चोरी अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून हे रोखण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहे. राजेंद्र उर्फ बंडूशेठ चिंतामणी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ उद्या शुक्रवार दि. 24 रोजी पाथर्डी शहरात बंद पाळण्यात येणार आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Comments