संगमनेर । वीरभूमी - 25-Feb, 2023, 01:12 AM
नैराश्याचा रंग हा काळा असून हे नैराश्य दूर करण्यासाठी स्वतः प्रकाशमान व्हा. स्वतः मधील गुण ओळखून प्रत्येक गोष्टीचा सकारात्मकतेने विचार केल्यास नवनिर्मिती होईल आणि हाच सकारात्मक विचार तुमच्या जीवनाचे यश मिळवून देईल असा मौलिक विचार आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत मेधा कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, आध्यात्मिक व कार्पोरेट प्रबोधनकार डॉ. पंकज गावडे, युवा व्याख्याते गणेश शिंदे, संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, मेधाचे समन्वयक प्रा. जी. बी. काळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कृष्णप्रकाश म्हणाले की, माणूस गरिबीत जन्माला आला हा त्याचा दोष नाही. मात्र गरिबीचे कारण सांगून जगत राहणे हा दोष ठरतो. तरुणांनी नेहमी सकारात्मक राहिले पाहिजे. प्रत्येक गोष्टीत नवनिर्मिती केली पाहिजे. संघर्षाचा रंग हा लाल असून मेहनतीचा रंग हिरवा आहे. नैराश्याच्या काळ्या अंधाकारातून दूर होण्यासाठी स्वतःला प्रकाशमान करा.
प्रत्येकाच्या जीवनात असफलता येते. मात्र त्याने खचून जाऊ नका. राष्ट्रपुरुष, थोर समाज सुधारक यांच्या विचारांचे अनुकरण करा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या घोषणा देण्यापेक्षा त्यांचा प्रत्येक विचार व जीवनकार्य हे प्रेरणादायी असून त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलूंचा आदर्श घ्या.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी माळरानावर शिक्षणाचे हे नंदनवन फुलवले असून आज या ठिकाणी दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हा एक राज्यातील आदर्श उदाहरण आहे.सकारात्मकता हीच तुमची मोठी संपत्ती ठरणार असून शिक्षणाचा वापर हा देश हितासाठी करा असे आवाहन ही त्यांनी केले. प्रबोधनकार पंकज महाराज गावडे म्हणाले की, सध्या तरुण हे सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत.
सोशल मीडियाने माणूस माणसापासून दुरावला असून प्रेम भावना वाढली पाहिजे. अहंकाराने माणूस संपतो. स्वतःमध्ये गुण निर्माण करताना अहंकार कमी करा. प्रत्येकाने जीवनात ध्येय ठेवा. चांगले वाचन करा, चांगले मित्र जोडा, चांगला आहार घ्या, चांगले आरोग्यदायी युवक हीच देशाची संपत्ती असल्याचे ते म्हणाले.
गणेश शिंदे म्हणाले की, ज्ञानाला पर्याय नाही. शिक्षणाने नोकरी मिळते. नोकरीच्या मागे न जाता महाराष्ट्रीयन मुलांनी जास्तीत जास्त व्यवसाय केला पाहिजे. माहिती आणि ज्ञान यामध्ये मोठा फरक आहे. मार्कासाठी अभ्यास करू नका गुणांच्या सूज वाढवण्यापेक्षा गुणवत्ता वाढवणे महत्त्वाची आहे. आयुष्य म्हणजे संघर्ष आणि तडजोड असून स्वतःमधील वेगळेपणा शोधा यश नक्की मिळेल आणि जीवन सुंदर होईल असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. बी. एम. लोंढे, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, प्रा. एस. टी. देशमुख, सौ. जे. बी. शेट्टी, शितल गायकवाड, अंजली कानावर, प्रा. विलास शिंदे, नामदेव गायकवाड, प्रा. अशोक वाळे, नामदेव कहांडळ आदींसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेथा कमिटीचा चैतन्य जोशी यांनी केले. सूत्रसंचालन हर्ष कहांडळ यांनी केले तर गौरव रोकडे यांनी आभार मानले. यावेळी इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, एमबीए, डी. फार्मसी, बी. फार्मसी, आयटीआय, ज्युनियर कॉलेज, मॉडेल स्कूल, इंटरनॅशनल स्कूल या विभागांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
Comments