बोधेगाव, खरवंडी कासार येथे नव्याने स्वतंत्र पोलिस ठाणे करा
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. मोनिकाताई राजळे यांच्या पुरवणी मागण्या । बाह्यवळणचा प्रश्नही मांडला
अहमदनगर । वीरभूमी - 03-Mar, 2023, 09:44 AM
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नावर आमदार मोनिकाताई राजळे यांनी लक्षवेधी मांडत प्रश्न सोडवणुकीसाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली. आ. राजळे यांनी आपल्या पुरवणी मगण्यामध्ये दोन्ही तालुक्यातील पोलिस ठाणे, पोलिस वसाहत, न्यायालय इमारतीसह अतिवृष्टी अनुदान, पिक विमा, बाह्यवळण रस्त्यासह राज्यमार्गाला निधी द्यावा. कृषी पंपाचा वीजपुरवठा यासह ऊस तोडणी व भटकंती करणार्या धनगर समाजाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवून निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
मुंबई येथे सुरु असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पयीन अधीवेशनात आमदार मोनिकाताई राजळे यांनी आज शेवगाव - पाथर्डी मतदार संघातील विविध प्रश्नासंदर्भात पुरवणी मागण्या मांडत विकासकामांसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली.
यावेळी आमदार मोनिकाताई राजळे आपल्या मागण्या मांडतांना म्हणाल्या की, शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघ मोठा असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपुर्या पोलिस कर्मचारी व अधिकार्यांमुळे ताण पडत आहे. यामुळे अनेक दिवसापासून मागणी असलेले छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्याच्या सीमा भागात असलेल्या बोधेगाव (ता. शेवगाव) व खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे नव्याने स्वतंत्र पोलिस ठाणे मंजूर करावेत. तसेच शेवगाव व पाथर्डी येथे पोलिस वसाहतीला मंजुरी द्यावी. शेवगाव पोलिस ठाण्याच्या प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र तेथील जागा महसूल विभागाकडे असून तीचे हस्तांतरण व्हावे.
शेवगाव व पाथर्डी तालुक्यात वृद्धेश्वर, गंगामाई, केदारेश्वर व ज्ञानेश्वर या साखर कारखान्याला ऊस वाहतूक केली जाते. वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या यामुळे शेवगाव व पाथर्डी शहरातून होणार्या वाहतुकीची कोंडी होते. यामुळे सर्व्हेक्षण होवून दोन्ही शहरांना बाह्यवळण रस्त्याचा व्हावा. तसेच तिसगाव ते पैठण व नेवासा ते गेवराई या राज्यमार्गाचे काम होणे गरजेचे असून त्या कामांना मंजुरी मिळावी.
शेवगाव येथे नगरपरिषद होवून सात वर्ष झाले आहेत. मात्र प्रशासकीय इमारतीचा प्रश्न कायम आहे. तसेच पाथर्डी येथे विविध विभागांची सेवा एकाच छताखाली मिळण्यासाठी मध्यवर्ती इमारत होणेसाठी निधी मिळावा. तसेच पाथर्डी येथील न्यायालयाची इमारत मोडकळीस आली असून इमारतीची जागाही अपुरी आहे. यामुळे न्यायालय इमारतीसाठी निधी मंजूर करावा. पाथर्डी येथे तहसील कार्यालयाची इमारत झाली आहे. मात्र त्या इमारतीला संरक्षक भिंत व फर्निचरसाठी निधी मिळावा.
ऊस तोडणी कामगार व मेंढ्या चारण्यासाठी धनगर समाजाची भटकंती होत असते. यामुळे ही कुटुंबे विस्तापित होवून त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहु नये यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा. तसेच धनगर समाज मेंढीपालन व्यवसाय करत असून या मेंढ्यांना बंदिस्त मेंढीपालन करण्यासाठी जमिन खरेदीसाठी अर्थयोजना राबवावी, अशी मागणी आ. राजळे यांनी केली.
आ. राजळे आपल्या मागण्या मांडतांना म्हणाल्या की, मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने गायगोठे, घरकुल व पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यातील पिकांची नुकसान भरपाई मिळाली. मात्र घरकुले, गायगोठे यांच्या नुकसानीची भरपाई मिळाली नसून ती तातडीने मिळावी. तसेच सन 2022 चा पिकविमा मिळावा.राज्यलोकसेवा मार्फत घेण्यात आलेल्या कृषीसेवा पुर्व व मुख्य परिक्षेविरोधात केलेल्या आंदोलनाची दखल घेवून त्यास स्थगिती द्यावी.
शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील वीजउपकेंद्रावरील भार वाढला असल्याने वीजेचा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे आवश्यक तेथे वीज उपकेंद्र उभारणीचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. या उपकेंद्रांना मंजुरी देवून वीजप्रश्न सोडवाव, अशी मागणी आ. राजळे यांनी केली.
‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ ही योजना राबवावी ः आ. राजळे
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांच्या सरकारने वाडी-वस्तीवर राहणार्यांना वीज मिळावी, यासाठी सौभाग्य योजना राबविली होती. ही योजना तत्कालिन सरकारने बंद केली असून ती पुन्हा सुरु करावी. शेतीपंपांना दिवसा वीज मिळावी, ही सर्व ठिकाणची मागणी आहे. यासाठी मागेल त्याला शेततळे या योजनेप्रमाणे मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजना राबवावी, अशी मागणी आ. राजळे यांनी केली.
HaozAgYmsqZGnw