पाथर्डी । वीरभूमी - 06-Mar, 2023, 05:51 PM
शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील जनतेचे प्रश्न समजावून घेत त्याची सोडवणूक करण्यासाठी संवाद यात्रा काढण्यात आली होती. या संवाद यात्रेचा समारोप व भगवानगड व 46 गावे पाणीपुरवठा योजनेचे भुमिपूजन यानिमित्त आयोजित भव्य शेतकरी मेळावा महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत पाथर्डी येथे उद्या मंगळवार दि. 7 मार्च रोजी होत आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन अॅड. प्रतापकाका ढाकणे यांनी केले आहे.
या शेतकरी मेळाव्यासाठी आमदार रोहित पवार, माजीमंत्री आ. प्राजक्त तनपुरे, आ. निलेश लंके, आ. आशुतोष काळे, आ. संग्राम जगताप, आ. किरण लहामटे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, विनायक देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेल्या भगवानगड व 46 गाव पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर शिवसेनेच्या पक्षांतर्गत बंडानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सूषमा अंधारे यांनी राज्यभर केलेल्या दौर्यानंतर त्या पाथर्डी तालुक्यात प्रथमच येणार असल्याने व निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह दिल्याने या निर्णयावर अंधारे काय बोलतात? याकडे ही तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
संवाद यात्रेच्या निमित्ताने ढाकणे यांनी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील 18 पंचायत समिती गणात सभा घेवून जनतेशी संवाद साधून प्रश्न समजावून घेतले. यावेळी त्यांनी तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नावर व विकास कामांबद्दल व शेतकर्यांच्या समस्या बाबत टीकेची झोड उठवली होती. या संवाद यात्रेमध्ये जनतेने वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शेती मालाला मिळणारा कवडीमोल भाव, प्रलंबित अतिवृष्टी अनुदान, पिकविमा, कर्ममाफीमधील प्रोत्साहान अनुदान अद्याप मिळाले नसल्याच्या अनेक तक्रारी केल्या.
या तक्रारी उद्या मंगळवार दि. 7 मार्च रोजी होणार्या शेतकरी मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यापुढे मांडण्यात येणार आहेत. संवाद यात्रेच्या माध्यमातून अॅड. ढाकणे यांनी तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी केल्याने व ढाकणे सक्रिय झाल्याने तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून याचा प्रत्यय येत आहे.
तरी या भव्य शेतकरी मेळाव्याला शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील नागरीक, शेतकरी कामगार, कार्यकर्ते यांच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
QctDiWfKYGUoM