मढेवडगावातील घटना । एटीएममधील सुमारे 5 लाखांची रक्कम लंपास
श्रीगोंदा । वीरभूमी - 11-Mar, 2023, 09:34 AM
नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावरील मढेवडगांव येथे इंडिया नंबर वन या खाजगी कंपनीचे एटीएम चोरट्यांनी जिलेटीनच्या सहाय्याने फोडून एटीएम मशीनमध्ये असलेली सुमारे 4 लाख 70 हजार 800 रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात केशव बुलाखे यांच्या फिर्यादवरून अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत.
या बाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार तालुक्यातील नगर - दौंड महामार्गावरील मढेवडगांव येथे इंडिया नं. एक या कंपनीचे खाजगी एटीएम असून या एटीएम मशीन मध्ये सुमारे 5 लाख 8 हजार 100 रुपये रक्कम शिल्लक होती. येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी एटीएमच्या दुकानाचे शटर फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर पैशांच्या मुख्य मशिनच्या लगत जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून ते फोडले.
स्फोट घडविण्यासाठी जिलेटिन कांड्यांचा वापर करत मशीन मधील सुमारे 4 लाख 70 हजार 800 रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले असून घटनेची माहिती पोलिसांना समजताच घटनास्थळी दाखल होऊन प्राथमिक तपास सुरू करत नगर येथील बॉम्बशोधक पथक, ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅब यांनाही पाचारण करण्यात आले होते.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर अभंग, विठ्ठल बढे व पोलिस कर्मचार्यांनी तातडीने धाव घेत पाहाणी केली. एटीएम फोडणारे तीन ते चार जण असल्याचा संशय पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी व्यक्त केला असून, त्यांनी जिलेटिन कांड्याद्वारे हा स्फोट घडवून आणला असल्याची खात्री केली. एटीएमच्या रूममध्ये काही नोटा विखरून पडल्याचे दिसून आले.
या घटनेमुळे एटीएमच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या सुमारास एटीएम बंद करण्यात येते. एटीएम रूममध्ये सुरक्षारक्षक नेमणुकीस नसल्याने हा प्रकार घडला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची चौकशी आदी बाबींचा विचार व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Comments