घुलेंच्या मनात आहे तरी काय?
मला आपल्याशी बोलायच...! मी येतोय.. आपणही या.. । उद्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
डावपेच । वीरभूमी 13-Mar, 2023, 10:17 AM
महादेव दळे, संपादक
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी मंगळवार दि. 14 मार्च रोजी शेवगाव येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. ‘मला आपल्याशी बोलायच...! मी येतोय आपणही या...’ असे म्हणत कार्यकर्त्यांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनामुळे ‘घुलेंच्या मनात आहे तरी काय?’ असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा राहीला असून उत्सुकता निर्माण झाली आहे.
शेवगाव-पाथर्डी मतदार संघ अस्तित्वात आल्यानंतर सन 2009 ची विधानसभा जिंकत राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले आमदार झाले. आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अनेक विकास कामे केली. प्रामुख्याने जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य देत बंधार्यांची मालिका उभारली. त्याचा परिपाक म्हणुन दोन्ही तालुक्यातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली.
विकासाबरोबरच बेरजेचे राजकारण करत विधानसभा निवडणुकीत ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवले ते स्व. राजीव राजळे व अॅड. प्रताप ढाकणे यांना ‘राष्ट्रवादी’त घेत गोळाबेरीज केली. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी स्व. राजीव राजळे यांनी पत्नी मोनिका राजळे यांना भाजपाची उमेदवारी मिळवत विजय मिळवला. यावेळी राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांना मोठ्या मताधिक्याने पराभवाला सामोरे जावे लागले.
यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत घुले यांनी उमेदवारी नाकारल्याने अॅड. प्रताप ढाकणे यांनी ‘राष्ट्रवादी’ची उमेदवारी करत निवडणूक लढवली. यावेळीही आ. मोनिका राजळे यांनी विजय मिळवला. मात्र 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत 2019 चे मताधिक्य कमालीचे घटले. मधल्या काळात चंद्रशेखर घुले यांनी पत्नी राजश्रीताई घुले यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान करत पुन्हा एकदा शेवगाव-पाथर्डी मतदार संघात ‘जनसंपर्क’ वाढवला.
क्षितीज घुले यांनीही पंचायत समिती सभापती पदाच्या माध्यमातून संपर्क वाढवत आपली पकड मजबुत केली. घुले यांच्या संपर्कामुळे कार्यकर्त्यांत नवचैतन्य आले, मात्र घुले-गडाख-राजळे नातेसंबध झाल्याने व घुले यांची भूमिका स्पष्ट नसल्याने आगामी निवडणुकांच्या द़ृष्टीने कार्यकर्ते गोंधळलेल्या अवस्थेत होते. जो तो आपआपल्या परीने अंदाज लावत होता.
तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत थोड्या मताने पराभव झाल्यानंतर अॅड. प्रताप ढाकणे यांनी ‘संवाद यात्रा’ काढून शेवगाव-पाथर्डी तालुक्यात पंचायत समिती गणनिहाय सभा घेत जनतेच्या अडचणी समजावून घेत विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना विकास कामांसाठी आणलेल्या निधींचा हिशोब द्या, एखादे ठोस काम दाखवा, असे सवाल उपस्थित करत ‘भावनिक’ राजकारण करत असल्याचा आरोप करत निशाना साधला.
एवढेच नव्हे तर या संवाद यात्रेचा समारोप विरोधीपक्षनेते अजित पवार व शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन केला. मेळाव्याला झालेली गर्दी ‘संवाद यात्रे’चा उद्देश सफल झाल्याचे भाव अॅड. ढाकणे यांच्या चेहर्यावर यावेळी दिसत होते.
मेळाव्यानंतर अजित पवार यांनी नगर येथे जिल्हा बँकेतील महाविकास आघाडीच्या संचालकांची बैठक घेऊन अहमदनगर जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्यावतीने चंद्रशेखर घुले यांचे नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता चंद्रशेखर घुले यांची अध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात होती. मात्र ऐनवेळी भाजपाकडून शिवाजीराव कर्डिले यांनी उमेदवारी करत ‘मविआ’ची मते फोडून विजय मिळवला. येथे संख्याबळ असतांनाही चंद्रशेखर घुले यांना पराभवाचा सामना करावा लागला.
जिल्हा बँक अध्यक्षपद निवडणुकीत संख्याबळ असतांना झालेला पराभव घुले यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते आहे. यानंतर माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवार दि. 14 मार्च रोजी शेवगाव येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी ‘मला आपल्याशी बोलायच..! मी येतोय.. आपणही या..’ अशी टॅगलाईन दिल्याने घुले काय बोलणार? घुलेंच्या मनात काय चालले आहे? घुले काय भूमिका घेणार? असे विविध प्रश्न कार्यकर्त्यांना पडले आहेत.
बिगर साखर कारखानदार अध्यक्ष पाहिजे म्हणुन पराभव!
नगर जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मविआने चंद्रशेखर घुले यांना उमेदवारी दिली. संख्याबळ असल्याने घुले यांची निवड निश्चित मानली जात होती. यामुळे काही उत्साही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल घुले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. काहींनीतर फटाकेही फोडले. मात्र भाजपाने ‘डावपेच’ टाकून शिवाजी कर्डिले यांना अध्यक्ष केले. येथे मविआचे तब्बल 5 संचालक विरोधात गेल्याने भाजपाचा विजय झाला. चंद्रशेखर घुले यांनी ज्ञानेश्वर साखर कारखाना अध्यक्ष, साखर संघाचे अध्यक्ष म्हणुन काम केलेले आहे.
साखर कारखानदारीतील त्यांचा दांडगा अभ्यास आहे. याचमुळे घुले अध्यक्ष झाले तर आपल्या साखर कारखान्याला ‘कर्ज’ मिळण्यात अडचणी येवून शकतील तर बिगर कारखानदार अध्यक्ष असेल तर सर्वांना समान धरले जाईल, या भावनेतून घुले यांच्या विरोधात मतदान झाले असल्याची चर्चा आहे. तर काहींच्या मते भाजपाने संचालकांवर दबाव आणल्याचे बोलले जात आहे.
JwYGQpqarD