कोपर्डी येथील घटना । कर्जत तालुका प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर
कर्जत । वीरभूमी- 13-Mar, 2023, 10:43 PM
सोमवारी संध्याकाळी कोपर्डी (ता.कर्जत) येथील शेतातील बोअरवेलमध्ये ऊसतोड कामगारांचा पाच वर्षांचा मुलगा पडला असून त्याला वाचविण्यासाठी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. सदरच्या परिस्थितीवर तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहे. घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित तळ ठोकून आहेत.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून, कोपर्डी (ता.कर्जत) येथील संदीप ज्ञानदेव सुद्रीक यांच्या गट नंबर 148 मधील उसाच्या शेतात ऊसतोड करणार्या कामगारांचा पाच वर्षाचा मुलगा सागर बुधा बरेला (रा.चिडीयापुरा ता बर्हाणपूर मध्यप्रदेश) हा सोमवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास बोअरमध्ये पडला.
तो बोअरच्या 15 फूट खोलीवर असल्याचे जाणवत असून त्याला वाचविण्यासाठी समांतर दोन जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू आहे. यासह त्यास ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्राणवायूची नलिका बोअरमध्ये सोडण्यात आली आहे. सदरच्या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित यांच्यासह पोलीस कर्मचारी श्याम जाधव, गोवर्धन कदम, राहुल खरात आणि जितेंद्र सरोदे यांनी कोपर्डी गाठत युद्धपातळीवर ग्रामस्थांच्या साह्याने मदतकार्य हाती घेतले.
घटनास्थळी कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयाची टीम, कर्जत नगरपंचायत अग्निशामक दल यांच्यासह महसुल प्रशासन आणि गटविकास अधिकारी तळ ठोकून आहेत. मुलांच्या कुटुंबियांसह, तालुका प्रशासन, कोपर्डी ग्रामस्थ देखील बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. तो सुखरूप बाहेर यावा यासाठी ग्रामस्थ देखील साकडे घातले आहे. जामखेड येथील रिस्क्यू टीमला देखील पाचारण करण्यात आले असल्याचे समजते.
कुरुक्षेत्रच्या प्रिन्सची आठवण ताजी
दि. 21 जुलै 2006 साली कुरुक्षेत्र- हरियाणा येथील पाच वर्षाचाच प्रिन्स असाच 60 फूट खोलीवर बोअरवेल मध्ये पडला होता. त्यास भारतीय जवानांनी तब्बल 49 तासांच्या अथक प्रयत्नाच्या बचाव कार्यानंतर सुखरूप बाहेर काढला होता. त्याच्या सुरक्षिततेसाठी भारतदेशात अनेकांनी पार्थना केली होती. सागरच्या सुरक्षिततेसाठी देखील त्याच्या कुटूंबियांसह कोपर्डी आणि परिसरातील ग्रामस्थ आणि महिला परमेश्वरास साकडे घालत आहेत.
कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलाचा जीव वाचला पाहिजे ः आ. प्रा. राम शिंदे
कोपर्डी येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची माहिती आ. प्रा. राम शिंदे यांना मिळताच त्यांनी तात्काळ कर्जतचे प्रभारी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना भ्रमणध्वनी करीत मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्या मुलांचा जीव कोणत्याही परिस्थितीमध्ये वाचलाच पाहिजे असे सांगितले. रात्री 10:30 च्या दरम्यान पुण्याची एनडीआरएफची टीम कोपर्डीत दाखल झाली असल्याची माहिती तहसीलदार नाईकवाडे यांनी राम शिंदेना दिली.
Comments