पाथर्डी । वीरभूमी - 19-Mar, 2023, 12:26 AM
शासनाकडुन भटक्यांची सर्वाधिक उपेक्षा होत आहे. शासनाच्या कोणत्याही योजना भटक्यांपर्यत पोहोचत नाहीत. सरकार कुणाचेही असो भटके भटकेच राहीले आहेत.
राज्यातील एकूण 42 पोट जातीस सर्व प्रमुख समाज बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व भटक्यांना एकत्रीत करून समाज बांधवांचा समस्यांच्या संघर्षाचा आवाज मुंबई व दिल्ली पर्यंत पोहचवला जाईल. त्यासाठी वर्षभर राज्यात विविध ठिकाणी आंदोलन उभारणार असल्याची माहिती अखिल भारतीय भटका जोशी समाज संघटनेचे अध्यक्ष वामनराव मापारे यांनी दिली.
श्रीक्षेत्र मढी येथे चैतन्य कानीफनाथांच्या यात्रेनिमीत्त पुर्वी अठरा पगड जातीच्या जातपंचायती चालत राज्यतील भटका समाज मढीला येत असल्याने भटक्यांची पंढरी म्हणुन यात्रेकडे पाहिले जायचे. गेल्या पाच वर्षापासुन जातपंचायती अधिकृतपणे बंद असल्याने जात पंचायती ऐवजी समाजाचा मेळावा घेऊन समाज बांधव एकत्रीत करण्याचा उपक्रम जोशी समाज बांधवांनी चालु ठेवला.
मढी येथील जोशी समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष राजेंद्र जोशी, जिल्हा युवाअध्यक्ष पिंटू वाघडकर, प्रवक्ते नारायण पाटील, कार्याध्यक्ष सोपान महापुरे, सचिव बाबासाहेब महापुरे, अॅड. मुकुंद येदमळ, नारायण गदई, समाधान गुराळकर, प्रल्हाद सुरडकर, उत्तमराव सावंत, बाबासाहेब वाकडकर, सागर महापूरे, सुरज मापारे, विजय गुर्हाळकर, दादासाहेब शिंदे, पोपटराव गोंडे, जालिंदर गोंडे, दादासाहेब गजरे, शिवाजी गोंडे, सोमनाथ सुपेकर, कैलास ढवळे, विजय चव्हाण, अंबादास अटक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वामनराव मापारे म्हणाले, भटके समाज खरोखरच राज्यभर भटकंती करतात. कायमस्वरूपी पत्ता नसल्याने आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड निघत नाही. त्याशिवाय कोणतेही कामे होत नाहीत. भटक्यांनी आयुष्यभर भटकत राहावे की, शासनाकडून काही मार्ग निघणार आहे. आम्ही भारतीय आहोत याचा पुरावा दाखवू शकत नसल्याने नवख्या गावात आम्हाला चोर समजून हाकलून लावतात. प्रसंगी मारहाण सुद्धा करतात. समाजातील तरुणांनी आता न्यायाच्या हक्कासाठी वैयक्तिक हेवेदावे सोडून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
आरक्षण नसल्याने शिकून उपयोग नाही. अशी समज करत तरुणांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. आरक्षण आम्हाला मिळावं, कर्ज सुविधा मिळावी, अन्यथा न्याय हक्कासाठी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र जोशी म्हणाले की, ग्रामीण भागात दारादोर फिरून भविष्य सांगुन उदर निर्वाह करणारा समाज छत्रपती शिवरायांच्या काळात गुप्तचरांचे काम अंत्यत प्रभावीपणे करीत असे. काळानुसार बदल झाले. समाजात शैक्षणीक क्रांती झाली.
उत्पन्नाचे साधन नाही. समाजाची स्वतंत्र ओळख नाही. मेळाव्यात विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. आरक्षण मिळावे, जातीचे व अन्य दाखले घरपोच मिळावे. मुलीसाठी उच्च शिक्षण मोफत मिळावे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अन्य अत्याचार समिती कठीण करावी, यासह आदी स्वरूपाचे ठराव बैठकीत संमत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब माहापुरे यांनी केले तर नारायण गदई यांनी आभार मानले.
soCEmMtkW