अनुराधा नागवडे यांची टीका
श्रीगोंदा । वीरभूमी - 02-Apr, 2023, 01:02 PM
अदानी उद्योग समूहात वीस हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? व आदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध काय? असा प्रश्न संसदेत विचारल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर देणे ऐवजी राहुल गांधींना खोट्या केसमध्ये अडकवून त्यांना दोन वर्षाचे शिक्षा देणे व त्यांची खासदारकी रद्द करणे हे केंद्र सरकारचे कृत्य भारतीय लोकशाहीचा गळा घोटणारे असून खरे बोलणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय ही बाब अतिशय गंभीर असून भविष्यात भारत हुकूमशाही कडे वाटचाल करत असल्याचे द्योतक असल्याची टीका अहमदनगर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी केली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सौ. नागवडे यांनी म्हटले आहे की, दि.7 फेब्रुवारी रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे ही केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी होती. परंतु तसे झाले नाही. त्यांच्या परदेश दौर्यातील वक्तव्यावर संसदेत त्यांना बोलू दिले नाही.उलट आदानी यांच्या घोटाळ्यासंदर्भातील राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणाचा भागच कामकाजातून वगळून टाकला आणि केंद्र सरकार आदानीची पाठ राखण करण्यासाठी उभे राहत आहे याचा अर्थ काय?
सर्वात विशेष म्हणजे आज देशातील विविध न्यायालयात हजारो केसेस प्रलंबित असताना त्यांची वर्षानुवर्ष सुनावणी होत नाही. मात्र राहुल गांधींनी अदानी संदर्भात संसदेत प्रश्न विचारला आणि नऊ दिवसातच त्यांच्या विरोधात मानहानीचे प्रकरण बाहेर काढून सुनावणी झाली, शिक्षाही सुनावली, आणि त्यांची खासदारकीही तातडीने रद्द केली. हा सर्व घटनाक्रम पाहता केंद्र सरकारच्या विरोधात जो बोलेल तो अपराधी ठरेल व त्याला शिक्षा दिली जाईल ही भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने धोक्याची घंटा असल्याचे मत सौ. नागवडे यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेस पक्ष व गांधी घराण्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी फार मोठे योगदान दिले असून इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलेले आहे. त्यांचे विचार व संस्कार घेऊनच राहुल गांधींनी 3500 किलोमीटरची भारत जोडो यात्रा केली. अशा व्यक्तीला देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न अतिशय निंदनीय असून भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहून केंद्र सरकार धास्तावले असल्यामुळेच त्यांनी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे.
आज देशात शेतकरी, बेरोजगारी, कामगार, महागाई, इंधनाचे वाढलेले दर असे सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित असणारे कितीतरी प्रश्न गंभीर रुप धारण करून उभे आहेत परंतु पंतप्रधान त्यावर बोलत नाहीत. दिवसेंदिवस खाजगीकरण चालू आहे. म्हणून हा देश व या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षांनी ही लढाई सुरू केलेली असून उद्या जनतेच्या दरबारात जाणार असल्याचे सौ. नागवडे यांनी म्हटले आहे.
RdOpIUiaC