शेवगाव । वीरभूमी- 03-Apr, 2023, 12:20 PM
महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच अवैध गौण खनिज वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या शेवगाव महसूल पथकावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना रविवारी रात्री हसनापूर (ता. शेवगाव) परिसरात घडली. या घटनेमध्ये महसूलचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.
याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात चौघांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे अशा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत परिविक्षाधिन नायब तहसीलदार राहुल गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अर्जुन विष्णु ढाकणे, विठ्ठल लक्ष्मण ढाकणे, अनिकेत अर्जुन ढाकणे व अंगद अर्जुन ढाकणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील हसनापूर शिवारातून अवैध गौण खनिजाची बेसुमार वाहतूक सुरु असल्याची माहिती महसूलचे परिविक्षाधिन नायब तहसीलदार राहुल गुरव यांना समजली. त्यांनी या अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी अव्वल कारकुन रवींद्र सानप, मुंगीचे तलाठी सचिन लोहकरे, हातगावचे तलाठी सोमनाथ आमने यांना सोबत घेत संबधित ठिकाणी गेले असता तेथे गौण खनिज वाहतूक करणारा ट्रॅक्टर आढळला. ट्रॅक्टरमध्ये अवैध गौण खनिज असल्याने त्यांनी ट्रॅक्टर चालकाला थांबण्याचा इशारा करताच ट्रॅक्टर थांबवून चालक पसार झाला.
त्यानंतर थोड्यावेळातच तेथे अर्जुन विष्णू ढाकणे हा बुलेट (क्र. एमएच 17, बीके 8618) वरुन तेथे आला व पथकाशी उर्मट भाषेत बोलू लागला. यावेळी त्याला परिचय दिला असता तो म्हणाला की, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. तहसील कार्यालयात ट्रॅक्टर घेवून जाणार नाही, असे सांगितले. त्यावेळी तेथे विठ्ठल ढाकणे, अंगद ढाकणे हे दोघे दुचाकीवरुन आले. त्यांच्या हातात काठ्या व लोखंडी गज होते. हे दोघे तेथे येताच यांनी पथकातील अधिकार्यांना शिवीगाळ करत तेथून ट्रॅक्टर चालू करुन पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
पथकाने ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न केला असता संबधितांनी पथकाला काठ्या व लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी विठ्ठल ढाकणे याने यांना जीवंत सोडत नाही म्हणत दगडी पाटा पथकाच्या दिशेने भिरकावला. याचवेळी प्रसंगवधान राखत तलाठी सचिन लोहकरे यांना बाजुला ओढल्याने दगडाचा पाटा गुरव यांच्या डाव्या हाताला लागून मुका मार लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी जमा झालेल्या लोकांनी सोडवासोडवी केली.
त्या दरम्यान विठ्ठल ढाकणे हा ट्रॅक्टर घेवून पळून गेला. या मारहाणीत नायब तहसीलदार राहुल गुरव यांच्या हाताला, रवींद्र सानप यांच्या डाव्या हातावर मुका मार लागला. तर सचिन लोहकरे यांना पाठीवर व उजव्या खांदयावर तर सोमनाथ आमने यांना डाव्या खांद्यावर कोपरावर, दोन्ही गुडघ्यावर, उजव्या हाताला जखमा झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अर्जुन ढाकणे यास अटक केली आहे. महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच महसूल पथकावर असा जीवघेणा हल्ला झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
OvBEkcmKAXJgD