पाथर्डी शहरातील घटना । जखमींच्या पायाचा चेंदामेंदा
पाथर्डी । वीरभूमी- 03-Apr, 2023, 11:17 PM
पाथर्डी शहरातील जुन्या बसस्थानक परिसरातील स्व. वसंतराव नाईक चौकात सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एसटी बसच्या चाकाखाली येऊन एका इसमाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. राजेंद्र मर्दाने (रा. कसबा पेठ, पाथर्डी) असे एसटीच्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
राजेंद्र मर्दाने यांच्या डाव्या पायावरून एसटी बसचे पुढील चाक गेल्याने गुडघ्याच्या खालील पायाचा भाग अक्षरशा चंदामेंदा झाला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी आगाराची एसटी बस ही पाथर्डीच्या जुन्या बस स्थानकावरून बाहेर पडताना स्व. वसंतराव नाईक चौकात जागेवरच असलेल्या वळणावर हा अपघात घडला. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेला आहे.
पाथर्डी व इतर आगाराच्या एसटी बसेसला पाथर्डीच्या जुन्या बसस्थानकातून बाहेर पडण्यासाठी अतिक्रमणे व खाजगी वाहनांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यातून अशा छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. शहराच्या मुख्य चौकात अपघात झाल्याने कल्याण निर्मल (विशाखापट्टणम) हा शहरातून जाणार्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रसाळ, संदीप बडे, संजय बडे हे घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी राजेंद्र मर्दाने यांना तातडीने पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
RbdCFphyI