पूर्वीच्या राजकारणात नितीमत्ता होती ः आ. बबनराव पाचपुते
बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचपुते - नागवडे - भोस यांचे शेतकरी मेळाव्यात शक्तीप्रदर्शन
श्रीगोंदा । वीरभूमी - 15-Apr, 2023, 08:54 AM
गेल्या चाळीस वर्षांपासून मी व स्व. शिवाजीराव बापू नागवडे पारंपारिक विरोधक होतो. आमचे राजकीय मतभेद होते मात्र मनभेद कधीही नव्हते. राजकीय भूमिका जरी वेगळी होती तरीही कधीही खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका केली नाही. मी व बापू यांनी नेहमी तालुक्याच्या विकासाच्या राजकारणात एकमेकांना मदत केली आहे.
आज राजकारणाची भाषा व दिशा बदलली असून विरोधक वैयक्तिक हेवेदावे, खालच्या थराला जाऊन टीका करत आहेत. त्यांचे राजकारण चुकीच्या पद्धतीने सुरू असून ही त्यांची चूक नसून माझीच आहे. कारण त्यावेळी मी निर्मल मनाने त्यांना मदत केली. आज तेच त्याची परतफेड करून आपली लायकी दाखवून देत आहेत. असा घणाघात आ. बबनराव पाचपुते यांनी राहूल जगताप यांच्या गटावर केला.
श्रीगोंदा येथील नक्षत्र मंगल कार्यालयात आ. बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे व बाबासाहेब भोस यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन केले, यावेळी आ. पाचपुते बोलत होते. यावेळी आ. बबनराव पाचपुते म्हणाले की, आपण आता झालेल्या चुका सुधारून बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही देणार असलेल्या पॅनलला सर्वांनी विजयी करावे. कारण हा विजय माझा किंवा नागवडे यांचा नसून शेतकर्यांचा असेल.
राज्यातील सरकार बदलले असल्याने विकासासाठी भरभरून निधी मिळाला आहे. रस्ते, पाणी आणि वीज यासाठी निधी कमी पडू देणार नाही. राजकारण विकासासाठी करायचे. या विकासासाठी तुम्ही माझ्या बरोबर येऊ नका, मीच तुमच्या बरोबर येतो, असे पाचपुते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आक्रमक बोलताना सांगितले की, नागवडे कुटुंबाने राजकारणात कधीच गद्दारी केली नाही आणि भविष्यातही करणार नाही.
बाळासाहेब नाहाटा यांनी अनेकांना गंडा घातला, त्यात तालुक्यातील अनेकजण आहेत. शेतकरी हीत डोळ्यासमोर ठेऊन श्रीगोंदा बाजार समिती निवडणुकीत आ. बबनराव पाचपुते यांच्याबरोबर तुमच्या हितासाठी युती केली.
ज्या अपप्रवृत्ती आमच्या जिवावर मोठ्या झाल्या आहेत त्या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठीच बाजार समितीच्या निवडणुकीत पाचपुते - नागवडे युती केली आहे. येत्या बाजार समिती निवडणुकीत कोण उमेदवार? यापेक्षा खोटे बोलणार्या व फसवणार्या नेत्यांनी दिलेल्या उमेदवारांना पराभूत करा, असे आवाहन केले.
यावेळी पाचपुते-नागवडे युतीचे समन्वयक नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस परखड बोलताना म्हणाले की, खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत नाहाटा माझ्याकडे आले व विरोधी पक्षनेते अजितदादा यांनी ही निवडणूक बिनविरोध करा असा आदेश केला. म्हणून मी आ. पाचपुते आणि नागवडे यांच्या बरोबर चर्चा करून निवडणूक बिनविरोध केली.
मात्र येथील राष्ट्रवादीने आमचा घात केला, असा आरोप माजी आ. राहुल जगताप, बाळासाहेब नाहाटा व अण्णासाहेब शेलार यांचा नामोल्लेख टाळून करत ‘आता या निवडणुकीत मी आ. पाचपुते आणि राजेंद्र नागवडे यांच्या बरोबर त्यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेण्यासाठी संपुर्ण ताकद पणाला लावणार असल्याचे सांगितले.
मेळाव्याला काष्टी सोसायटीचे माजी चेअरमन भगवान पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते, पोपटराव खेतमाळीस, डी. डी. घोरपडे, आदेश नागवडे, प्रेमराज भोईटे, अरुण पाचपुते, स्मितल वाबळे, पुरुषोत्तम लगड, शहाजी हिरवे, अर्जुन बोरुडे, मनोहर पोटे यांच्यासह नागवडे, पाचपुते यांना मानणारे तालुक्यातील पदाधिकारी, मतदार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments