विखेंचा डाव, शिंदेंचा घाव
पक्षाने संधी दिल्यास नगर दक्षिणची जागा लढवणार असल्याचे आ. राम शिंदेंकडून जाहीर । सुजय विखेंची अडचण वाढणार?
महादेव दळे । डावपेच- 19-Apr, 2023, 09:29 AM
राज्यातील सत्ता बदलानंतर राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याच दरम्यान नाशिक पदवीधर निवडणुकीच्या काळात आ. सत्यजित तांबे यांना भाजपा पक्षात घेऊन विखेंना शह देण्याची व्युहरचना आखली जात होती. मात्र आ. सत्यजित तांबे यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवारी करत भाजपा प्रवेश टाळला. त्यानंतर आता आ. राम शिंदे यांनी अहमदनगर दक्षिणमधून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून त्याची वर्षेभर तयारी करणार असल्याचे जाहीर केले.
यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी खा. सुजय विखे पाटील यांना प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागणार असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियातील चर्चानुसार मुख्यमंत्री पदासाठी विखे यांनी टाकलेल्या ‘डावा’वर आ. राम शिंदे यांनी ‘घाव’ घालत ‘मला पक्षाने संधी दिलीतर’ म्हणत डावपेच टाकल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.
भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी व जवळचे मित्र म्हणुन आ. राम शिंदे यांची ओळख आहे. सन 2014 च्या निवडणुकीत आ. राम शिंदे यांनी विजय मिळवत अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळले. मात्र सन 2019 च्या निवडणुकीत आ. राम शिंदे यांना कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात पराभव पत्कारावा लागला. या पराभवाला कोण जबाबदार आहे? याची तक्रार आ. शिंदे यांनी पक्षनेतृत्वाकडे केली होती.
या काळात जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर भाजपा पक्षाने राम शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी दिली. त्यातच मंगळवारी आ. राम शिंदे यांनी ‘पक्षाने संधी दिली तर आपण नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याची घोषणा केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
आ. राम शिंदे म्हणाले की, ‘भाजपने मला संकेत दिले होते की, तुम्हाला राज्यसभेचा फार्म भरावा लागेल. त्यानुसार अर्ज भरण्याची मी तयारीही केली होती. सर्व कागदपत्रे जोडून उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी, असे सांगण्यात आले की, तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी नाही. मात्र, त्यानंतर मला विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली.
मी आमदार असतांना 2014 मध्ये माझे मत नव्हते मात्र आमदार व कार्यकर्त्यांचे मत होते की, मी लोकसभा निवडणूक लढवली पाहिजे. आमदार आणि सर्व लोकांंशी चर्चा करुन लोकसभेसाठी मी इच्छुक झालो होतो. मात्र त्यावेळी स्व. दिलीप गांधी, मी आणि प्रताप ढाकणे असे इच्छुक होतो. प्रताप ढाकणे आणि माझ्या वादामध्ये दिलीप गांधी यांना पक्षाने उमेदवारी दिली.
पक्षाचा निर्णय मान्य करून त्यांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न केले. 2019 ला मी मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. यावेळी आमच्या पक्षातील व सर्वच लोकांनी सांगितले की, तुम्ही लोकसभेसाठी उभे राहीले पाहिजे. परंतू मी त्यासाठी उभा राहण्यासाठी जी भूमिका घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नाही. तत्कालिन राजकीय परिस्थितीमध्ये सुजय विखेंचा प्रवेश झाला. त्यांना निवडून देण्याची पालकमंत्री म्हणुन असलेली जबाबदारी पार पाडली.
मात्र लोकसभा निवडणुकीसाठी दुसर्यांदाही नकार दिला होता. परंतु 2024 निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणूक लढणार आहे. मात्र लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्यास माझ्या मनाचीही तयारी ठेवलेली आहे. पक्षाचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता असल्याने यावेळेस मी पूर्ण तयारीशी लोकसभेसाठीही इच्छुक असल्याचे आ. राम शिंदे यांनी जाहीर केले.
आ. राम शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेने विद्यमान खा. सुजय विखे यांना भाजपा तिकिट देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला असून जिल्ह्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
खा. लोखंडे यांचा कित्ता आ. शिंदे गिरवणार? कर्जत-जामखेड मतदार संघाचे 10 वर्षे नेतृत्व केल्यानंतर आ. राम शिंदे यांना 2019 निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर भाजपने त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. याच कर्जत-जामखेड मतदारसंघाचे 1995 ते 2004 या कालखंडात नेतृत्व केलेले नेते सदाशिव लोखंडे यांनी 2014 आणि 2019 मध्ये शिर्डी मतदारसंघातून खासदारकी लढवत विजय मिळवला आहे. त्यांच्याप्रमाणेच आ. राम शिंदे विधानसभेऐवजी लोकसभा निवडणूक लढवणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विखेंना डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे का? मुख्यमंत्री पदासाठी राधाकृष्ण विखे पाटील इच्छुक असल्याच्या चर्चांमुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्याचवेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशा बातम्या मला बदनाम करण्याच्या उद्देशाने दिल्या जात असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस चांगले काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात आपण काम करत असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता आ. राम शिंदे यांच्या दक्षिण लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याच्या भूमिकेने विखेंना डॅमेज करण्याचा हा प्रयत्न आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
anmyEsjeHbkI