श्रीगोंद्यात भाजपा-काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादीत लढत
बाजार समितीच्या 18 जागांसाठी 48 उमेदवार निवडणूक रिंगणात । नागवडे-पाचपुते विरोधात राहुल जगताप गटाचा पॅनल भिडणार
विजय उंडे । वीरभूमी - 20-Apr, 2023, 11:57 PM
श्रीगोंदा : सध्या हाय व्होल्टेज ठरलेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गुरूवार दि.20 रोजी अर्ज माघारी दिवशी 18 जागांसाठी तब्बल 48 उमेदवार रिंगणात उतरले असून सर्वाधिक 191 अर्ज आलेल्या सेवा संस्था मतदारसंघात 9 जागांसाठी 28 उमेदवार भिडणार आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात 6 जागांसाठी 12 उमेदवारांनी अर्ज ठेवले. व्यापारी - आडते मतदासंघांत 2 जागेसाठी 5 उमेदवार समोरासमोर लढणार असून मापाडी- हमाल मतदारसंघात 1 जागेसाठी 3 उमेदवारांनी अर्ज ठेवले आहेत.
नागवडे - पाचपुते विरुद्ध माजी आमदार राहुल जगताप गटांच्या पॅनलमध्ये मात्तबर उमेदवारांच्या उमेदवारीमुळे बाजार समितीची निवडणुक आरोप प्रत्यारोपांनी आधीच हाय व्होल्टेज ठरलेली निवडणुक येणार्या विधानसभेची सराव मॅच ठरणार आहे.
माजी आमदार राहुल जगताप, बाळासाहेब नहाटा व अण्णासाहेब शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी विकास पॅनलमध्ये सेवा संस्था मतदारसंघात सर्वसाधारण जागांसाठी दिपक माणिकराव भोसले पाटील, भास्कर बापूराव वागस्कर, अजित अरविंद जामदार, पंडित भगवान गायकवाड, नितीन शिवाजी डुबल, अनिकेत रविंद्र शेळके, बाबासाहेब भाऊसाहेब जगताप तर महिला प्रतिनीधी म्हणून मनिषा योगेश मगर व अंजली संदीप रोडे यांनी अर्ज भरले आहेत.
इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात प्रविण लक्ष्मण लोखंडे, भटक्या विमुक्त जमाती मतदार संघात दत्तात्रय सोनबा गावडे, तर ग्रामपंचायत मतदारसंघात साजन सदाशिव पाचपुते, मितेश प्रवीणकुमार नहाटा, अनुसुचित जाती जमाती मतदारसंघात शंकर सावळेराम पाडळे, आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघात देविदास गणपत शिर्के, हमाल मापाडी मतदारसंघात किसन रामभाऊ सिदनकर तर व्यापारी आडते मतदार संघात शिवाजी महादू शेळके हे उमेदवार पॅनलमध्ये आहेत.
आ. बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे व बाबासाहेब भोस यांच्या नेतृत्त्वाखालील किसान क्रांती शेतकरी विकास पॅनलमध्ये सेवा संस्था मतदारसंघात सर्वसाधारण जागांसाठी दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, निवास श्रीधर नाईक, रोहिदास किसन पवार, प्रदीप किसन कोकाटे, संतोष एकनाथ ओव्हळ, सुभाष रामदास वाघमारे, रामदास भगवान झेंडे, महिला प्रतिनिधी म्हणून सविता बाबासाहेब बारगुजे व सविता भिमराव नलगे, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात वैभव पांडुरंग पाचपुते, तर भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघात ज्ञानदेव गणा खरात यांची उमेदवारी आहे.
ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारण जागांसाठी महेश दिलीप दरेकर, सुदाम नामदेव झराड, अनुसुचित जाती जमाती मतदारसंघात प्रशांत दत्तात्रय ओगले, आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघात लक्ष्मण विठ्ठल नलगे, व्यापारी आडते मतदारसंघात लौकिक दिलिप मेहता व आदिक दत्तोबा वांगणे तर हमाल मापाडी मतदारसंघात भाऊसाहेब मारूती कोथींबीरे यांच्या उमेदवारी आहेत. 28 एप्रिल रोजी मतदान असल्याने कोण बाजी मारेल हे लवकरच समजेल.
त्याच त्या चेहर्यांना संधी.. नवख्यांना मात्र डच्चू..
दोन्ही पॅनलमध्ये उमेदवारी देताना नेत्यांनी आपला नेहमीचाच कित्ता गिरवलेला दिसतोय. आपल्या भोवताली फिरणार्या बगलबच्चांनाच संधी देऊन नेत्यांनी त्यांना पुन्हा उजळून काढले. मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, पंचायत समिती या संस्थांमध्ये अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. चळवळीत अग्रेसर असलेल्या संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस व राजेंद्र मस्के यांना पॅनलमध्ये येऊ न देण्यासाठी नेत्यांनी आपली कार्यक्षमता बरोबर वापरली. विक्रमी उमेदवारी अर्ज भरूनही अनेक नवख्या उमेदवारांना बाहेरचा रस्ता दाखवला हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. मोकळ्या हाताने माघार घ्यावी लागल्याने अनेक उमेदवारांचा हिरमोड झाला.
नाहाटा, पानसरे, पाचपुते, भोसले, गावडे हे दिग्गज निवडणुकीत उतरल्याने रंगत वाढली...
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांचे चिरंजीव मितेश, आ. बबनराव पाचपुते यांचे पुतणे व स्व. सदाशिव पाचपुते यांचे चिरंजीव साजन पाचपुते, जिल्हा बँकेचे माजी संचालक व दत्तकृपा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे व महेश्वर मल्टीस्टेट संस्थेचे चेअरमन दत्तात्रय गावडे, तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष दीपक पाटील भोसले व सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवराव मगर यांच्या स्नुषा या मत्तबर उमेदवारांमुळे मार्केट कमिटीची निवडणुक टोकाची होणार असल्याची चाहूल लागली आहे.
KYgqcwXIdJ