... इकडे मिळाले.. तिकडे मिळाले.. आपल्याला कधी? मतदारांची कानोकानी
विजय उंडे । वीरभूमी - 26-Apr, 2023, 07:53 AM
श्रीगोंदा : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन दादा विरूद्ध एक दादा अशी लढत शिगेला पोहोचली आहे. हाय व्होल्टेज झालेली ही निवडणूक नेत्यांच्या अस्तित्वाच्या मुळावर येऊन पोहोचल्याने जाहीर सभांऐवजी ही एकमेव निवडणुक तांत्रिकरीत्या हाताळली जात आहे. सर्वच दोन्ही पॅनलनी ‘वाटपा’ वरच भर दिल्याने मतदारांची चंगळ झाली आहे.
खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत तालुक्यातील प्रमुख सर्वच नेत्यांनी एकत्रित येऊन पॅनल उभे केले होते. माजी आमदार राहुल जगताप यांनी त्या निवडणुकीत आपले डावपेच टाकत ही संस्था त्यांच्या ताब्यात घेतली. माजी आमदार राहुल जगताप यांना एकाकी पाडून आ. बबनराव पाचपुते व सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी एकत्रित येत त्यांच्या विरोधात पॅनल उभे केले.
नागवडे - पाचपुते यांच्या दृष्टीने एकतर्फी वाटणारी ही निवडणूक कमालीची चुरशीची झाली आहे. माजी आमदार राहुल जगताप आपल्या समर्थनाचा विस्तार करण्यात या निवडणुकीच्या निमित्ताने कमालीचे यशस्वी झाले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजपर्यंतच्या निवडणुकीत सभांवर जोर दिला जायचा. यावेळच्या निवडणूकीत आजपर्यंत एकही सभा झालेली नाही. नेत्यांनी तांत्रिक निवडणुकीवरच भर दिलेला आहे. उमेदवार ठरवताना आर्थिकदृष्ट्या तगडे असलेल्यांनाच उमेदवारी दिली आहे. उमेदवारी ठरवताना प्रामाणिकपणा, समाजाभिमुख कार्यकर्ता त्याचा आजपर्यंतचा त्याग हे सगळे विसरून ज्याचे डिपॉझिट जास्त त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.
बाजार समितीची ही एकमेव निवडणुक कोटींची उड्डाणे करणारी ठरणार आहे. साजन पाचपुते व मितेश नाहाटा यांच्या उमेदवारीमुळे ग्रामपंचायत मतदार संघ जास्त चर्चेत आला आहे. चहापानाच्या नावाखाली या मतदारसंघात वाटपाची एक फेरी झाली आहे. एका गटाने चहापानाची फेरी केल्यानंतर दुसर्या गटाने चहापान केले आहे.
आता जेवणाच्या आकड्याची वाट मतदार पाहत आहेत. सोसायटी मतदार संघावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्याने दोन्ही बाजूच्या नेत्यांनी या मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. कोणता पॅनल आकडा मोठा लावतो यावर या निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. चंगळवाद वाढलेली ही निवडणुक काही उमेदवार दोनशे प्लस व तीनशे प्लस करण्यासाठी आपले स्वतंत्र आकडे लावून आहेत.
उमेदवार पैसेवाला पाहिजे.. मग दे की आता.... बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. सहकारी संस्थामध्ये दुर्बल घटक हा मतदारसंघ निवडणुकीतून हद्दपार झाला आहे. मात्र कृषी उत्पन्न समितीत दुर्बल घटक मतदारसंघ अजूनही अस्तित्वात आहे. दुर्बल घटक मतदार संघातील उमेदवार अधिक प्रबळ आहेत. त्यामुळे या दुर्बलांची चर्चा मतदारांमध्ये खमंग रंगली आहे. ठेवीदार नसलेल्या उमेदवारांना पॅनलवाल्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. लईच तगड्या उमेदवारांना उभे केलंय तं आता येऊ दे माल...म्हणून मतदार दारात वाट पाहत आहेत.
qOAiQRsarhvJ