ग्रामपंचायत मतदार संघ टार्गेट केल्याने साजन पाचपुते, नाहाटा सरसावले
विजय उंडे । वीरभूमी - 26-Apr, 2023, 08:13 AM
श्रीगोंदा : राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांना टार्गेट केले जात असल्याने मतदारांमध्ये त्यांची सहानुभूती वाढत चालली आहे. साजन पाचपुते व मितेश नाहाटा यांचा पराभव करायचाच या ईर्षेने राजकीय षडयंत्र खेळले जात असताना बाळासाहेब नाहाटा व साजन पाचपुते यांनी या निवडणुकीत नव्याने ‘पॅटर्न’ राबविला आहे.
एकेकाळी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती अडगळीत पडलेली असताना बाळासाहेब नाहाटा यांनी मार्केट कमिटीची सूत्रे आपल्या हाती घेतली. अध्यक्षपदाच्या 13 वर्षांच्या कार्यकाळात मार्केट कमिटीचा चेहरा-मोहरा त्यांनी बदलून टाकला. राज्य बाजार समितीच्या संचालक मंडळात तीन खासदार व पाच आमदार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांचा समावेश असताना बाळासाहेब नाहाटा यांना बाजार समितीमधील राज्याचे प्रमुखपद मिळाले. तसेच बाळासाहेब नाहाटा व अण्णासाहेब शेलार हे माजी आमदार राहुल जगताप यांची तळी उचलतात या असुयेपोटी नाहाटा यांना या निवडणुकीत टार्गेट केले जात आहे.
बाळासाहेब नाहाटा यांनी स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून श्रीगोंदा तालुक्यात त्यांचे समाजकारण उभे केले. अनेक दीन-दुबळ्यांना मदतीचा आधार दिला. मतदारांमध्ये नाहाटा यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती निर्माण होत आहे. नाहाटा यांच्या राजकारणात त्यांना भरभक्कम पाठबळ दिलेल्या स्व. सदाशिवअण्णा पाचपुते यांचे चिरंजीव साजन पाचपुते हे नाहाटा यांच्या मदतीला धावून आले. साजन पाचपुते यांनी ग्रामपंचायत मतदार संघात उमेदवारी करू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले मात्र साजन पाचपुते आपल्या भूमिकेवर ठाम राहून बाळासाहेब नाहाटा यांचे चिरंजीव मितेश नहाटा यांच्यासह ग्रामपंचायतचे उमेदवार म्हणून उभे राहिले.
माजी आमदार राहुल जगताप यांची ताकद बाळासाहेब नाहाटा, साजन पाचपुते व अण्णासाहेब शेलार यांच्यामुळे वाढते, यामुळे या तिघांना टार्गेट केले जात आहे. अण्णासाहेब शेलार हे स्वतः या निवडणुकीत उभे नाहीत मात्र नाहाटा यांचे पुत्र मितेश व साजन पाचपुते हे उभे आहेत. साजन पाचपुते व मितेश नाहाटा यांचा पराभव करायचाच व माजी आमदार राहुल जगताप यांचे खच्चीकरण करायचे यासाठी विरोधक कामाला लागले आहेत.
बाळासाहेब नाहाटा व स्व. सदाशिव पाचपुते यांच्या मैत्रीची काढली जातेय आठवण... स्व. सदाशिव अण्णा पाचपुते व बाळासाहेब नाहाटा यांची मैत्री कायम राहिली. तालुक्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे घडली मात्र या मैत्रीत कधीही खंड पडला नाही. स्व. सदाशिव अण्णा यांना तालुक्यात मानणारा मोठा जनाधार होता. तो जनाधार साजन पाचपुते व मितेश नाहाटा यांच्या पथ्यावर पडत आहे.
Comments