राहूल जगताप यांच्या हवेमुळे विरोधकांची धावपळ
सोसायटी मतदारसंघाची सूत्रे नियोजनबद्ध पद्धतीने हाताळल्याने एकतर्फी वर्चस्व सिद्ध होणार
विजय उंडे । वीरभूमी- 27-Apr, 2023, 09:40 AM
श्रीगोंदा : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक दोन वर्षांपासून स्वतंत्र लढवायची या इराद्याने माजी आमदार राहुल जगताप यांनी या निवडणुकीची तयारी ठेवली. जिल्हा बँकेचे संचालक असल्यामुळे सोसायटी मतदारसंघावर त्यांनी वर्चस्व निर्माण केले आहे. निवडणुकीचे पारडे जगतापांकडे झुकत असल्याचे चित्र आहे.
माजी आमदार राहुल जगताप हे जिल्हा बँकेत बिनविरोध संचालक झाले. जिल्हा बँकेच्या संचालकाशी सहकारी संस्थांच्या पदाधिकार्यांचा दैनंदिन संबंध येतो. सहकारी सोसायटीच्या संचालकांशी कर्ज वितरण करताना श्री. जगताप यांची भूमिका सकारात्मक राहिलेली आहे. सहकारी संस्थांच्या कर्ज वितरणामध्ये राजकारण न आणता अनेक विरोधी संस्थांना त्यांनी भरभरून मदत केल्याने त्यांचे तालुक्यातील बहुसंख्य सहकारी संस्थावर वर्चस्व निर्माण झाले आहे.
माजी आमदार राहुल जगताप यांचे सहकारी संस्थांवर एकहाती वर्चस्व असल्याचे श्रीगोंदा बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने बाजार समितीची निवडणुक ही कलाटणी देणारी असल्याने दोन्ही पॅनलकडून सर्वस्व पणाला लावले आहे.
विधानसभा डोळ्यासमोर ठेवून बाजार समिती निवडणुकीची तयारी श्री. जगताप दोन वर्षांपासून करीत आहेत. त्यांच्या राजकीय नियोजनाला या निवडणुकीत फळ मिळताना दिसत आहे. विशेषतः सहकारी संस्था मतदार संघावर त्यांचे वर्चस्व निर्माण झाल्याने विरोधकांची या मतदार संघात हतबलता लपून राहत नाही. माजी आमदार राहुल जगताप यांनी नागवडे - पाचपुते यांना आपणच सक्षम पर्याय ठरू शकतो हे जनमानसात रुजविण्यात यशस्वी झाले आहेत.
चाळीस वर्षे पाचपुते-नागवडे यांच्या राजकीय संघर्षात दुखावलेले कार्यकर्ते जवळ घेण्यात राहुल जगताप यशस्वी झाले आहेत. स्वतंत्र पॅनल करून आपला राजकीय विस्तार करण्यात श्री. जगताप कमालीचे यशस्वी झाले आहेत. याउलट नागवडे - पाचपुते यांनी एकत्रित येऊन उमेदवारीचे अर्ध्या - अर्ध्या जागेवर समाधान मानल्याने अनेक उमेदवारांच्या नाराजीला सामोरे जावे लागले आहे.
नेत्यांना नाहाटा राजकारणात का नको? : श्रीगोंद्याच्या राजकारणात बाळासाहेब नाहाटा यांनी अनेक सामान्य कार्यकर्त्यांना महत्त्व प्राप्त करून दिले. प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात संघर्ष उभा करून अनेक कार्यकर्त्यांना नेते म्हणून उदयास आणले. माजी आमदार राहुल जगताप यांना जिल्हा बँकेत बिनविरोध संचालक करण्यात नाहाटा यांची भूमिका यशस्वी ठरली. उद्या विधानसभेला बाळासाहेब नाहाटा हेच अडसर ठरत असल्याने या निवडणुकीत नाहाटांचा पाडाव करायचाच यासाठी विरोधकांनी जातीयवाद करण्याचा प्रयत्न चालवला आहे. नाहाटा राजकारणात नसल्यास कोणत्याच निवडणुकीत रंगत येणार नाही, हे मतदार जाणून असल्याने मतदारांच्यात त्यांच्याबद्दल सहानुभूती वाढीस लागली आहे.
राजकारणात ‘वाळूवाले’ होत आहेत शिरजोर : नागवडे-पाचपुते यांचा 40 वर्षे राजकीय संघर्ष तालुक्याने अनुभवला आहे. मात्र एकीकडे राजकीय संघर्ष चालू असताना वाळू धंद्यात दोघांचे समर्थक एकत्रित असायचे. वाळू धंद्यातून कोट्यावधी माया या मंडळींनी जमवली. पैशाने गब्बर झाल्याने अनेकांचा राजकीय प्रवास सुरू झाला आहे. तर काहींचा या निवडणुकीच्या निमित्ताने होत आहे. भविष्यात राजकारणाची सर्व सुत्रे या वाळूवाल्यांनी ताब्यात घेतल्यास नवल वाटायला नको.
QAzIKHRXLj