अहमदनगर । वीरभूमी - 14-May, 2023, 12:43 PM
राहाता तालुक्यातील गणेश अहकारी साखर कारखाना व शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीला बिगुल वाजला आहे. गणेशसाठी 17 जून तर केदारेश्वरसाठी 18 जून रोजी मतदान होत आहे. दोन्ही कारखान्यासाठी 15 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे.
गणेश कारखाना भाजपाचे खा. डॉ. सुजय विखे यांच्या तर केदारेश्वर कारखाना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांच्या ताब्यात आहे. दोन्ही कारखान्याचा निवडणुकीला बिगुल वाजल्याने सहकाराच्या राजकारणात हालचालींना वेग वाढला आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने गणेश व संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या सोमवार दि. 15 मे पासून प्रारंभ होत आहे. ही मुदत 19 मे पर्यंत आहे. त्यानंतर दाखल अर्जाची छाननी 22 मे रोजी होणार आहे. दि. 6 जून पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी तर दि. 7 मे रोजी निवडणुकीच्या रिंगणात राहणार्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. तर आवश्यक असल्यास गणेशसाठी 17 जून रोजी तर संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्यासाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 19 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
दोन्ही कारखान्यासाठी प्रत्येकी 19 जागा निवडून द्यावयाच्या आहेत. गणेश कारखान्यासाठी सर्वसाधरण जागेसाठी शिर्डी 2, राहाता 3, अस्तगाव 3, वाकडी 3, पुणतांबा 2 अशा 13 जागा निवडून द्यावयाच्या आहेत. तर उत्पादक सहकारी सनस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी 1, अनु. जाती/अनु. जमाती प्रतिनिधी 1 जागा, महिला प्रतिनिधी 2, इतर मागास प्रवर्ग 1, भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रतिनिधी 1 अशा 19 जागा निवडून द्यावयाच्या आहेत.
तर संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर करखान्यासाठी सर्वसाधरण जागेसाठी बोधेगाव 2, हातगाव 3, मुंगी 3, चापडगाव 3, हसनापूर 2 अशा 13 जागा निवडून द्यावयाच्या आहेत. तर उत्पादक सहकारी सनस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी 1, अनु. जाती/अनु. जमाती प्रतिनिधी 1 जागा, महिला प्रतिनिधी 2, इतर मागास प्रवर्ग 1, भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रतिनिधी 1 अशा 19 जागा निवडून द्यावयाच्या आहेत.
दोन्ही कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. गणेश कारखाना भाजपा खा. सुजय विखे यांच्या तर केदारेश्वर कारखाना राष्ट्रवादीचे अॅड. प्रताप ढाकणे यांच्या ताब्यात आहे.
Comments