भाजपा - राष्ट्रवादीला 9-9 जागा कायम । आता पदाधिकारी निवडीकडे लक्ष
कर्जत । वीरभूमी - 22-May, 2023, 03:20 PM
कर्जत बाजार समितीच्या 9 जागेच्या फेर मतमोजणीनंतर आमदार राम शिंदेच्या कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल आणि आमदार रोहित पवार यांच्या सहकार व शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या समसमान 9-9 जागा कायम राहिल्या. फेर मतमोजणीत कोणताही बदल घडला नाही.
परिस्थिती जैसे थे राहत याउलट आक्षेप घेतलेल्या भरत पावणे आणि लीलावती जामदार यांचे एक मत कमी झाले. महिला राखीवमध्ये दि. 29 च्या मतमोजणीत अवैध मतांची संख्या 4 होती आजच्या फेर मतमोजणीत 6 झाली. यामुळे सुवर्णा कळसकर आणि लीलावती जामदार यांच्या मतांमध्ये अवघे दोन मतांचा फरक पडल्याने कळसकर दोन मतांनी विजयी ठरल्या.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या लढतीत आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या पॅनलला समसमान 9-9 जागा मिळाल्या होत्या. भाजपाचे उमेदवार भरत पावणे आणि लीलावती जामदार यांनी दि. 29 एप्रिलच्या मतमोजणीवर आक्षेप घेतल्याने आज सेवा सोसायटीच्या 9 जागेसाठी फेर मतमोजणी पार पडली. फेर मतमोजणी कक्षात फक्त नियुक्त राजकीय प्रतिनिधींच यांनाच प्रवेश दिला.
अत्यंत संथ गतीने मतमोजणी प्रक्रिया सुरू होती. सकाळी 8 वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी दीड वाजता पूर्ण झाली. यामध्ये दोन्ही पॅनलच्या 9-9 जागा कायम राहिल्या. तसेच विजयी उमेदवारांत देखील बदल घडला नाही. मतांची संख्या एक-एक वाढल्याने आणि कमी झाल्याने विजयी अनुक्रमांकात मात्र बदल झाला. राष्ट्रवादीचे संग्राम पाटील आणि गुलाब तनपुरे यांचे एक-एक मत वाढले. तर भाजपाचे नंदराम नवले आणि आक्षेप घेतलेले भरत पावणे यांचे एक-एक मत कमी झाले.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परिस्थिती जैसे थे च राहिल्याने आता पदाधिकारी निवडीकडे लक्ष लागले आहे. जामखेड पाठोपाठ कर्जतच्या पदाधिकारी निवडीत देखील ईश्वर चिठ्ठीचा कौल घ्यावा लागतो का? हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
संथ फेर मतमोजणीने तासनतास शेतकरी ताटकळले.
सोमवार कर्जतचा आठवडे बाजार असल्याने शेतकरी आपले धान्य विकण्यासाठी कर्जत बाजार समितीमध्ये येत होते. मात्र मतमोजणीमुळे सर्व आडत दुकाने प्रशासनाने बंद ठेवले होते. विशेष म्हणजे याची कसलीही सूचना प्रसिद्ध न केल्याने धान्य विकण्यासाठी आलेल्या तालुक्यातील शेतकर्यांना नाहक हेलपाटा पडत मोठा मनस्ताप सहन करावा लागला. उन्हाच्या तडाख्यात शेतकर्यांना दुपारपर्यंत ताटकळत पडावे लागले.
BQRKjemTE