शेवगाव । प्रतिनिधी - 23-May, 2023, 04:27 PM
तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीत दाखल अर्जाची छाननी होवून सहा अर्ज बाद झाले तर 34 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर उत्पादक सहकारी संस्था प्रतिनिधी गटात प्रताप बबनराव ढाकणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.
संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या 19 जागेसाठी 40 जणांनी 49 अर्ज दाखल केले होते. या दाखल अर्जाची सोमवारी छाननी होवून आज मंगळवारी वैध, अवैध उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिद्ध केली आहे.
यामध्ये बोधेगाव सर्वसाधारण गटातून बाळासाहेब अंबादास खेडकर, सर्वसाधारण मुंगी गटातून लक्ष्मण गंगाराम टाकळकर, रमेश नवनाथ केदार, मारुती तात्याबा मोडके, सर्वसाधारण चापडगाव गटातून उत्तम सिताराम आंधळे व सदाशिव हरीभाऊ दराडे या सहा जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
छाननी नंतर सर्वसाधारण बोधेगाव गटातील दोन जागेसाठी 3, सर्वसाधारण हातगाव गटात 8, सर्वसाधारण मुंगी गटात 3, सर्वसाधारण चापडगाव गटात 3, सर्वसाधारण हसनापूर गाटत 3 उत्पादक सहकारी संस्था प्रतिनिधी 1, अनुसुचित जाती-जमाती गटात 2, महिला प्रतिनिधी गटात 3, इतर मागास वर्ग गटात 2, भ. वि. जाती/जमाती वि.मा. प्रवर्ग गटात 6 असे एकुण 34 अर्ज राहीले आहेत.
वैध ठरलेल्या अर्जदारांना माघारीसाठी 6 जून पर्यंत मुदत आहे. तर आवश्यक असल्यास 19 जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन प्रादेशिक उपसंचालक (साखर) अहमदनगरचे डॉ. प्रवीण लोखंडे हे काम पहात असून त्यांना गहिनीनाथ विखे हे सहाय्य करत आहेत.
संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यावर प्रताप ढाकणे यांची सत्ता आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीत विरोधी भाजपाकडून कोणीही उमेदवारी अर्ज न भरल्याने वैध ठरलेल्या अर्जापैकी कोणाची संचालक म्हणुन निवड होईल व कोणाला माघार घ्यावी लागेल, हे 6 जून नंतरच कळणार आहे.
मात्र उत्पादक सहकारी संस्था प्रतिनिधी गटात प्रताप ढाकणे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर इतर जागा बिनविरोध करण्यासाठी काहींची मनधरणी करावी लागणार आहे. मनधरणीसाठी ढाकणे कसे प्रयत्न करतात व कारखाना निवडणूक बिनविरोध करतात, याकडे सभासदांसह तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहीले आहे.
XSRIomKryYAQvUba